‘तुमच्यात ‘गट्स’ आहेत, मग बॉलिवूडमध्ये या’ - किर्ती कुल्हारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 19:11 IST2017-07-06T13:40:59+5:302017-07-06T19:11:27+5:30
अबोली कुलकर्णी किर्ती कुल्हारी हिने ‘खिचडी: द मुव्ही’ या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘शैतान’ चित्रपटानंतर तिला ‘पिंक’ ...

‘तुमच्यात ‘गट्स’ आहेत, मग बॉलिवूडमध्ये या’ - किर्ती कुल्हारी
किर्ती कुल्हारी हिने ‘खिचडी: द मुव्ही’ या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘शैतान’ चित्रपटानंतर तिला ‘पिंक’ चित्रपटाची आॅफर आली. ‘पिंक’ नंतर तिच्या करिअरला ‘यू टर्न’ मिळाला. आत्तापर्यंत विविधांगी भूमिका साकारताना शिकण्याची धडपड, जिद्द, उमेद तिने टिकवून ठेवली. आता ती आगामी चित्रपट ‘इंदू सरकार’ मधून महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी केलेला हा दिलखुलास संवाद...
* ‘इंदू सरकार’ मधील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटात मी एका युवतीची भूमिका साकारतेय. तिला कविता करण्याची आवड असते. तिला लग्न करायचं असतं, पतीसोबत संसार थाटायचा असतो. मात्र, आणीबाणीमुळे तिचा संसार कसा उद्धवस्त होतो, याचे चित्रण यात केले आहे. आक्रोश, हतबलता आणि त्यातून परिस्थितीशी दोन हात करत लढणारी एक सर्वसामान्य महिला अशा चौफेर कथानकावर ‘इंदू सरकार’ भाष्य करतो.
* ‘इंदू सरकार’ची आॅफर मिळाल्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती?
- नक्कीच. मला खुप आनंद झाला होता. ‘पिंक’ नंतर लगेचच मला एवढ्या मोठ्या बॅनरअंतर्गत आणि दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणार होतं. त्यातील रोल माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. नवीन शिकायला मिळणार होतं. त्यामुळे हा चित्रपट करायला मिळणार असल्याने मी प्रचंड खुश होते.
* भूमिकेसाठी तुला काय तयारी करावी लागली?
- चित्रपटातील भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. यासाठी मला काही विशेष तयारी करावी लागली. मी यूट्यूबचे व्हिडीओ पाहिले. स्पिच थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्टला भेटले. त्यांच्यामुळे मला कळालं की, माझी बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे? मी कसे कॉस्च्युम घातले म्हणजे मी त्या भूमिकेप्रमाणे दिसेन. भूमिकेचा इमोशनल ग्राफ तर मला नेहमीप्रमाणे तयार करावा लागला.
* ‘खिचडी : द मुव्ही’ या कॉमेडी चित्रपटामधून तू बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहेस. त्यानंतर कॉमेडी चित्रपट करावासा का वाटला नाही?
- खरंतर, त्यानंतर मी इरफान खानसोबत ‘रायता’ हा कॉमेडी चित्रपट के ला आहे. अलीकडेच आम्ही या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. अभिनय देव दिग्दर्शित हा चित्रपट नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होईल. मला कॉमेडी चित्रपटात काम करायला प्रचंड आवडतं. मी करत राहीन.
* ‘पिंक’ चित्रपटानंतर तुझ्या आयुष्यात काय बदल झाला? चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- ‘पिंक’ चित्रपट माझ्या करिअरचा टर्निंग पॉर्इंट ठरला. त्यानंतरच मला ‘इंदू सरकार’ सारखा चित्रपट आॅफर झाला. चांगला चित्रपट, आव्हानात्मक भूमिका हे सर्व ‘पिंक’चीच देण आहे. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे स्वप्नच. व्यक्ती कितीही मोठा झाला तरीही किती नम्र असू शकतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळते.
* तू ‘जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन’ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. मीडियात करिअर करण्याचा विचार केला नाही का?
- मला अभिनेत्रीच व्हायचे होते. त्यामुळे शिक्षण घेत असताना मला जर्नालिझम हा विषय वेगळा आणि इंटरेस्टिंग वाटला. म्हणून मी याचे शिक्षण घेतले. सध्याचा मीडिया खूपच व्यापक झाला आहे. बातम्या, स्टोरीज आणण्याचे पत्रकारांवरही प्रेशर असते. त्यामुळे असे वाटते की, क्वालिटी घसरते आहे. ‘ओव्हरडोस आॅफ इन्फॉर्मेशन’ होतेय, असे मला वाटते.
* तुझे वडील भारतीय नौसेनेत कार्यरत आहेत. घरातील त्यांच्या शिस्तीमुळे तुझ्यावर किती परिणाम झाला?
- माझे वडील नेव्हीमध्ये होते पण, चित्रपटात जसे दाखवले जाते तसे स्ट्रिक्ट अगदीच नव्हते. ते आम्हा मुलांसोबत नेहमीच खुप कूल असायचे. कोणत्याही गोष्टीचं कधीच आमच्यावर प्रेशर नसायचं. त्यांना मी माझ्या आयुष्यात प्रेरणास्थानी मानते. कुटुंबाची जबाबदारी, कर्तव्ये पार पाडताना मी पाहिलंय. त्यामुळे त्यांच्यातील काही गुण माझ्यात नक्कीच आले असतील.
* एम्पॉवरमेंट, इक्वॅलिटी आणि फेमिनिझम याविषयी काय वाटते?
- हा विषय खरंतर इतका व्यापक आणि महत्त्वाचा आहे की, तो दोन ते तीन ओळींमध्ये संपणार नाही. यावर मी स्वतंत्ररित्या बोलू इच्छिते.
* आयुष्यात तुझे प्रेरणास्थान कोण आहे?
- माझ्या आई-वडिलांना मी प्रेरणास्थानी मानते. खरंतर, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे आपण बरंच काही शिकत असतो. जे आपल्याला कधीकधी लक्षात येत नाही. आयुष्यानी एवढं काही शिकवलंय ना की, तेच प्रेरणास्थानी मानावेसे वाटते.
* सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. तुला संधी मिळाली तर करशील का?
- नक्कीच, मला करायला आवडेल. नवीन-नवीन गोष्टी ट्राय करत राहिल्या पाहिजेत. मी कोणत्या भूमिकेत योग्य वाटेल हे कदाचित मलाही कळणार नाही. पण, अशा प्रोजेक्टसमधून मला नक्कीच कळेल.
* बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसताना काम करणं, प्रोजेक्ट्स मिळणं किती अवघड आहे?
- स्ट्रगल तर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असतो. तो असलाच पाहिजे. जर तुमच्यात सहनशक्ती असेल, तुमचे नशीब बलवत्तर असेल तर नक्कीच तुम्हाला प्रोजेक्टस मिळतील.