भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन ‘या’ सेलिब्रिटींनी दिला आधार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 19:00 IST2017-09-10T13:30:46+5:302017-09-10T19:00:46+5:30
अबोली कुलकर्णी बॉलिवूड जगतात अनेक गृहितकं अशी आहेत ज्यांचे पालन तुम्ही केले तर रातोरात सुपरस्टार होऊ शकता. जाणून घ्यायचंय ...

भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन ‘या’ सेलिब्रिटींनी दिला आधार !
बॉलिवूड जगतात अनेक गृहितकं अशी आहेत ज्यांचे पालन तुम्ही केले तर रातोरात सुपरस्टार होऊ शकता. जाणून घ्यायचंय कोणते आहे हे गृहितक? रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना जर बी-टाऊनच्या सेलिब्रिटींनी आधार दिला तर ते सुपरस्टार व्हायला वेळ लागत नाही. अभिनयाबरोबरच या अमुक एका स्टारच्या मनात सामाजिक जाणीव आहे, असा समज फॅन्सच्या मनात निर्माण होतो. बरं, आता केवळ हेच एक कारण आहे का? तर नाही. मनापासून प्राणी आवडणारे सेलिब्रिटीही आपण पाहतो. ज्यांना खरोखरच अशा मोकाट कुत्र्यांना प्रेमाची ऊब द्यावीशी वाटते. मग हे सेलिब्रिटी कुठल्याही प्रसिद्धीसाठी नव्हे तर त्यांच्या मनातील प्राणीप्रेमासाठी कुत्र्यांना दत्तक घेतात. पाहूयात असे कोणकोणते सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अशा भटक्या कुत्र्यांना दिला मदतीचा हात..
* गुल पनाग
प्राण्यांवर मनापासून प्रेम करणारी अभिनेत्री म्हणजे गुल पनाग. तिच्या घरी तिने आणलेले काही कुत्रे असून तिने सामाजिक भान म्हणून दोन कुत्र्यांना दत्तक घेतले होते. एवढंच नाही तर त्या कुत्र्यांचे देखील टिवटर अकाऊंट तिने बनवले आहेत. स्वत: फिटनेसच्या बाबतीत जागरूक असल्याने ती कुत्र्यांची काळजी देखील तेवढयाच निष्ठेने घेते. ती त्यांना ट्रेकिंग, परदेशात फिरायला देखील घेऊन जाते.
* कपिल शर्मा
कॉमेडी किंग कपिल शर्मा याने जंजीर या त्याच्या कुत्र्याला दत्तक घेतले आहे. हा कुत्रा म्हणे त्याच्या सेटवर रोज यायचा. दत्तक घेण्यापूर्वी जंजीर हा मुंबई पोलिसमध्ये काम करत होता. त्याला जंजीरचा एवढा लळा आहे की, तो त्याच्या शोवर देखील प्राण्यांना दत्तक घ्या, त्यांच्यावर प्रेम करा, असा संदेश देत असतो.
* रवीना टंडन
प्राणीमात्रांवर प्रेम करा असा संदेश देणारी अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. तिने आत्तापर्यंत चार कुत्रे, एक मांजर, ससा, माकड यांना दत्तक घेतले आहे. त्यांचे पालणपोषण ती स्वत: करते. त्यांना जास्तीत जास्त रिलॅक्स ठेवणे, त्यांच्यावर प्रेम करणे एवढाच संदेश ती लोकांनाही देत असते.
* सनी लिओनी
दत्तक घेऊन प्राण्यांना मायेची ऊब द्या असा संदेश देणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. तिने दोन कुत्र्यांना दत्तक घेतले आहे. तसेच ती गरजू प्राण्यांना हवी ती मदत करायला सतत तत्पर असते. ती तिच्या कुत्र्यांना ‘बेबीज’ म्हणून संबोधते.
* कल्की कोचलिन
उत्तम अभिनय, उत्कृष्ट स्क्रिप्ट निवडणारी अभिनेत्री कल्की कोचलिन ही बॉलिवूडची बबली गर्ल आहे. प्रत्येक भूमिकांमध्ये ती तिचा वेगळा ठसा उमटवत असते. तिने देखील मोकाट कुत्र्यांना आधार दिला असून कुत्र्यांनाही जगण्याचा हक्क आहे, तुम्ही दत्तक घेतले तर त्यांच्या नव्या जीवनाला सुरूवात होईल, असा संदेश ती देते.