वरुण-जान्हवीचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' ओटीटीवर कधी आणि कुठे होणार स्ट्रीम? जाणून घ्या....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:12 IST2025-10-31T11:56:39+5:302025-10-31T12:12:33+5:30
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' कधी व कुठे ऑनलाइन स्ट्रीम होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

वरुण-जान्हवीचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' ओटीटीवर कधी आणि कुठे होणार स्ट्रीम? जाणून घ्या....
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा रोमँटिक चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. रिलीजपूर्वी या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठं अपयश पत्करावं लागलं आणि तो फ्लॉप ठरला. हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तो कधी व कुठे ऑनलाइन स्ट्रीम होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आजकाल थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतात. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात, ते साधारणपणे दोन महिन्यांत ऑनलाइन येतात, तर जे फ्लॉप होतात ते एक महिन्यानंतर लगेचच ओटीटीवर प्रदर्शित होतात. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाबाबतही असेच चित्र दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
चित्रपटाचे डिजिटल हक्क थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच नेटफ्लिक्ससोबत करारबद्ध करण्यात आले होते. त्यामुळे, हा रोमँटिक चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर घरबसल्या अनुभवता येणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
 बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर
बॉक्स ऑफिसवर, 'कांतारा चॅप्टर १' सोबत झालेल्या संघर्षामुळे 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' कमाईच्या बाबतीत मागे पडला. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, वरुण धवनच्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६४ कोटींची कमाई केली. तर जगभरातील कमाईचा आकडा सुमारे ९८ कोटी आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी, आता ओटीटी रिलीजमुळे या चित्रपटाला घरी बसून पाहणाऱ्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
