Sagarika Ghatge Birthday Special : सागरिका घाटगे आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 18:28 IST2019-01-08T12:07:18+5:302019-01-09T18:28:11+5:30
सागरिका घाटगेचा आज म्हणजेच ८ जानेवारीला वाढदिवस असून ती एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी आहे.

Sagarika Ghatge Birthday Special : सागरिका घाटगे आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी
चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. पहिल्याच चित्रपटात तिला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. तिला या चित्रपटासाठी पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.
तिचा मान्सून फुटबॉल हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटावर ती सध्या काम करत आहे. यासोबतच तिने पंजाबी चित्रपटात देखील काम केले आहे. सागरिका घाटगेचा आज म्हणजेच ८ जानेवारीला वाढदिवस असून ती एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी आहे आणि विजयसिंग घाडगे यांची ती कन्या आहे
ऋषी कपूर, पद्मिनी कोल्हापूरे यांची मुख्य भूमिका असलेला प्रेमरोग हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापूरेच्या पतीची भूमिका विजयेंद्र घाटगे या अभिनेत्याने साकारली होती. सागरिका ही विजयेंद्र घाटगे या अभिनेत्याची पुतणी आहे. विजयेंद्र यांनी सत्तरीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्तचोर, रजिया सुलतान, सत्ते पे सत्ता या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. त्यांनी चित्रपटाप्रमाणेच जुनून, सिंहासन बत्तीसी, बुनियाद यांसारख्या मालिकांमध्येदेखील काम केले आहे. विजयेंद्र सिंहराव घाटगे हे इंदौरच्या शाही घराण्याचे वंशज आहेत. इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या सीताराजे घाटगे यांचे विजयेंद्र हे पुत्र आहेत.
सागरिकाचे लग्न प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये झाले असून ती तिचे व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्य व्यवस्थितपणे सांभाळत आहे. सागरिका आणि झहीर लग्न करणार असल्याच्या बातम्या २०१६ पासूनच मीडियात येत होत्या. अखेरीस त्यांनी २४ एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला. सागरिका ही खऱ्या आयुष्यात देखील हॉकी प्लेअर होती. तसेच तिचा भाऊ देखील हॉकी प्लेअर आहे.