रितेश, विवेक आणि आफताब त्रिकुटची 'मस्ती ४', या दिवशी सिनेमा येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:56 IST2025-10-10T15:55:41+5:302025-10-10T15:56:33+5:30
Masti 4 Movie : रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांचं त्रिकुट चौपट मस्ती घेऊन नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये परत येणार आहे.

रितेश, विवेक आणि आफताब त्रिकुटची 'मस्ती ४', या दिवशी सिनेमा येणार भेटीला
'मस्ती' ही कल्ट कॉमेडी फ्रँचायझी पुन्हा एकदा दमदार अंदाजात आणि चारपट वेडेपणासह परत येत आहे. मिलाप मिलन झवेरी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'मस्ती ४'चे चमकदार पोस्टर नुकतेच चित्रपटाचे निर्माते वेवबँड प्रॉडक्शनने प्रदर्शित केले असून, यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
मस्ती ४चे पोस्टर पाहताच चाहत्यांच्या मनात पहिल्या 'मस्ती' चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, जो खोड्या, हास्य-विनोद, मैत्री आणि कलाकारांच्या धमाल-मस्तीने भरलेला होता. आता पुन्हा एकदा तेच स्टार्स, म्हणजेच तुमचे आवडते 'ओजी बॉईज' रितेश देशमुख (अमर), विवेक ओबेरॉय (मीत) आणि आफताब शिवदासानी (प्रेम) हे 'मस्ती ४'मध्ये चौपट मस्तीच्या आश्वासनासह परतले आहेत. ही हसवून लोटपोट करणारी फिल्म २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'मस्ती ४'मध्ये सरप्राइझचा तडका
या चित्रपटाचे पोस्टर आकर्षक रंगांचे डिझाइन, धमाल वातावरण आणि लव्ह व्हिसा या मजेदार टॅगलाइनमुळे लक्ष वेधून घेत आहे. जुन्या चाहत्यांच्या आवडत्या कलाकारांच्या भूमिकेतील पुनरागमनासोबतच, या वेळी श्रेया शर्मा, रुही सिंग आणि एलनाज नोरौजी या अभिनेत्री हास्याचा तडका लावण्यासाठी येत आहेत, ज्या चित्रपटात नाविन्य आणतील. याव्यतिरिक्त, काही सरप्राइझ कॅमिओदेखील पाहायला मिळतील, जे चित्रपटाच्या जुन्या चाहत्यांसाठी एक खास भेट असेल.
या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे, मिलाप मिलन झवेरी यांची सिग्नेचर कॉमेडी, ओजी बॉईजचे दमदार पुनरागमन आणि चौपट मस्ती यासह, 'मस्ती ४' हा चित्रपट २०२५ सालातील सर्वात मोठा कॉमेडी ब्लॉकबस्टर ठरेल.