ऋषी कपूर त्यांच्या कमबॅकबद्दल रणबीर कपूरला सतत विचारत आहेत हा भावनिक प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:17 IST2019-04-01T19:14:30+5:302019-04-01T19:17:12+5:30
ऋषी कपूर यांच्या चाहत्यांप्रमाणेच ते स्वतः देखील त्यांच्या कमबॅकसाठी उत्सुक आहेत. त्यांचा मुलगा रणबीर कपूरनेच ही गोष्ट नुकतीच सांगितली आहे.

ऋषी कपूर त्यांच्या कमबॅकबद्दल रणबीर कपूरला सतत विचारत आहेत हा भावनिक प्रश्न
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर लवकरच मुंबईत परतणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या पण ते या महिन्यात तरी मुंबईत परतणार नसल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. सध्या ऋषी यांचे भाऊ अभिनेते रणधीर कपूर आणि त्यांची मुलगी करिश्मा कपूर ऋषी आणि नीतूसोबत अमेरिकेत आहेत.
ऋषी कपूर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांवर ते चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या ट्रीटमेंटला अजून काही वेळ लागणार असल्याचे म्हटले जात आहे. ऋषी भारतात परतणार कधी याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. ऋषी कपूर यांच्या चाहत्यांप्रमाणेच ते स्वतः देखील त्यांच्या कमबॅकसाठी उत्सुक आहेत. त्यांचा मुलगा रणबीर कपूरनेच ही गोष्ट नुकतीच सांगितली आहे.
झी सिने पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी हा पुरस्कार स्वीकारताना त्याने सांगितले की, मी हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना समर्पित करत आहे. माझे वडील सध्या त्यांच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळातून जात आहेत. मी त्यांच्याशी जेव्हा देखील गप्पा मारतो, ते केवळ चित्रपटांबद्दलच बोलतात.
एखादा चित्रपट कसा आहे, एखाद्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, एखाद्या कलाकाराचा परफॉर्मन्स कसा आहे, एखाद्या दृश्यात तू कसे काम केलेस याबाबतच ते मला विचारत असतात. त्यांच्या मनात असलेल्या असुरक्षिततेबद्दल देखील ते माझ्याशी गप्पा मारतात. मला पुन्हा चित्रपटांच्या ऑफर येतील का? मला पुन्हा चित्रपटात काम करायला मिळेल का? असे ते मला सतत विचारत असतात.