HIT - The First Case Movie Review : जाणून घ्या कसा आहे राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा 'हिट - द फर्स्ट केस'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:01 PM2022-07-15T17:01:32+5:302022-07-15T17:10:19+5:30

पोलिस खात्याचाच एक भाग असलेल्या 'हिट'साठी काम करणारा विक्रम एक हुषार अधिकारी आहे. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला जिवंत जाळताना विक्रम पहातो असं चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे.

Rajkummar Rao, Sanya Malhotra saterr HIT - The First Case Movie Review | HIT - The First Case Movie Review : जाणून घ्या कसा आहे राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा 'हिट - द फर्स्ट केस'

HIT - The First Case Movie Review : जाणून घ्या कसा आहे राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा 'हिट - द फर्स्ट केस'

googlenewsNext

कलाकार : राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, शिल्पा शुक्ला, संजय नार्वेकर, मिलिंद गुणाजी, दलिप ताहिल, जतिन गोस्वामी
दिग्दर्शक : शैलेश कोलानू
निर्माते : भूषण कुमार, क्रिशन कुमार, दिल राजू, कुलदीप राठोड, भौमिक गोंदलिया
शैली :  अ‍ॅक्शन थ्रिलर
कालावधी : २ तास १५ मिनिटे
दर्जा : अडीच स्टार 
चित्रपट परिक्षण : संजय घावरे 

कोणत्याही थ्रिलरपटासाठी पटकथेची मांडणी अतिशय महत्त्वाची असते. रहस्य उलगडल्यानंतर गुन्हा करण्यासाठी ठोस कारणही अपेक्षित असतं. उगाच प्रेक्षकांचा अंदाज चुकवण्यासाठी किंवा त्यांना गुंगारा देण्याच्या नादात न पटणारं कारण दिलं जातं तिथे बरेच थ्रिलरपट फसतात. या थ्रिलरपटाबाबत बोलायचं तर 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी गत आहे. दिग्दर्शक शैलेश कोलानू यांनी तमिळमध्ये गाजलेल्या चित्रपटाचा त्याच शीर्षकानं हिंदी रिमेक केला आहे, पण हिंदीत चित्रपट बनवताना इथल्या प्रेक्षकांची आवड ओळखून आवश्यक बदल करायला ते विसरले.

कथानक : पोलिस खात्याचाच एक भाग असलेल्या 'हिट'साठी काम करणारा विक्रम एक हुषार अधिकारी आहे. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला जिवंत जाळताना विक्रम पहातो असं चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे. या घटनेचे त्याच्या मनावर तीव्र पडसाद उमटल्यानं डॅाक्टर त्याला नोकरी सोडण्याचा सल्ला देतात, पण तो नकार देतो. फॅारेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करणारी त्याची प्रेयेसी नेहासुद्धा त्याला नोकरी सोडायला सांगते, पण तो ऐकत नाही. नेहा त्याला सुट्टी घेऊन आराम करायला सांगते. त्यानुसार विक्रम सुट्टी घेतो, पण नेहा हरवल्याचं समजल्यावर परततो. नेहाची केस दुसऱ्या अधिकाऱ्याकडे असते. नेहा हरवण्यापूर्वी प्रिती नावाची तरुणी हायवेवरून गायब झालेली असते. त्याची केस विक्रम हाती घेतो आणि अखेरीस दोन्ही केसचा गुंता सोडवतो.

लेखन-दिग्दर्शन : दिग्दर्शक शैलेश यांनीच लेखन केलं आहे. एका केसचा दुसऱ्या केसशी संबंध दाखवताना खूप गुंता झाल्यासारखा वाटतो. दिग्दर्शक या नात्यानं पटकथा पडद्यावर सादर करतानाही तो नीट सोडवण्यात आलेला नाही.
 

पटकथेची मांडणी खूप गुंतागुंतीची आहे. चित्रपटाची गती वेगवान असली तरी खूप फाफटपसारा मांडण्यात आल्यानं कंटाळा येऊ लागतो. सुरुवातीला दाखवलेल्या सीनचा नेमका काय संबंध आहे हे माहित पडेपर्यंत तो सीन विसरायलाही होतो. मध्यंतर होईपर्यंत फिरव फिरव फिरवल्यावर अखेरीस पुन्हा तिथेच आणून सोडलं आहे. पोलिसांचं तपासकार्य, फॅारेन्सिक डिपार्टमेंटची कामगिरी, छोट्याशा पुराव्यावरून आरोपीचा माग घेणं, सामान्य ज्ञानाचा वापर करून डेडबॅाडीपर्यंत पोहोचणं आणि तपासकामातील इतर बऱ्याच गोष्टी बारकाईनं सादर केल्या आहेत. काही संवाद अनपेक्षितपणे हसू फुलवतात. आश्चर्यकारक शेवट करण्याच्या नादात काहीसा गोंधळ झाला आहे. गाणी ठिक आहेत. कॅमेरावर्क सुरेख आहे. प्रेमकथा किंवा फ्लॅशबॅक यामध्ये जास्त वेळ घालवण्यात आलेला नाही.

अभिनय : राजकुमार राव हा उत्कृष्ट अभिनेता आहे. संवेदनशील अभिनयाचं दर्शन घडवत त्यानं साकारलेला एक वेगळा नायक यात पहायला मिळतो. सान्या मल्होत्राची भूमिका महत्त्वाची भूमिका अत्यंत असून तिनं चांगल्या प्रकारे साकारली आहे. संजय नार्वेकरनं फॅारेन्सिक आॅफिसरचा रोल केला आहे. शिल्पा शुक्लानं साकारलेल्या शेजारणीचा रोल तपासकामाची दिशा भटकवणारा असला तरी तिनं आपलं काम चोख बजावलं आहे. मिलिंद गुणाजीची भूमिका महत्त्वाची आहे, पण त्याच्यासारख्या कलाकाराकडून यापेक्षा आणखी चांगल्या व्यक्तिरेखांची अपेक्षा आहे. दलिप ताहिल आणि जतिन गोस्वामी यांनीही आपलं काम प्रामाणिकपणे केलं आहे.

सकारात्मक बाजू : तपासकामातील बारकावे अत्यंत चिकित्सक पद्धतीनं सादर करण्यात आले आहेत. कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

नकारात्मक बाजू : काही अनावश्यक ट्रॅक लांबी वाढवणारे आहेत. योग्य दिशा देऊन त्यांची लांबी आणखी कमी केली गेली असती तर कदाचित हा चित्रपट आणखी प्रभावी बनला असता.

थोडक्यात : हा चित्रपट अगदीच वाईट नाही. यातील रहस्य शेवटपर्यंत उलगडू दिलेलं नाही. त्यामुळं मोकळा वेळ असेल तेव्हा हा चित्रपट पहायला हरकत नाही.
 



 

Web Title: Rajkummar Rao, Sanya Malhotra saterr HIT - The First Case Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.