'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:52 IST2025-09-01T16:52:26+5:302025-09-01T16:52:46+5:30

'पापा कहते हैं' या चित्रपटातील 'घर से निकलते ही' या गाण्यामुळे मयूरी कांगो(Mayoori Kango)ला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यशाच्या शिखरावर असतानाच तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेतला.

'Papa Kehte Hai' fame actress Mayoori Kango quits Google job; now becomes CEO of Publicis Group | 'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

बॉलिवूडमध्ये स्टार होण्यासाठी लोक अनेकदा कॉर्पोरेट नोकरी सोडतात. पण अभिनेत्री मयूरी कांगो(Mayoori Kango)ची गोष्ट यापेक्षा निराळी आहे. महेश भट यांच्या 'पापा कहते हैं' या चित्रपटातील 'घर से निकलते ही' या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यशाच्या शिखरावर असतानाच मयूरीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. गूगल इंडियामध्ये एका उच्च पदावर काम केल्यानंतर, तिने आता आणखी एक मोठी झेप घेतली आहे. कॉर्पोरेट जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मयूरी कांगो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने गूगलची नोकरी सोडून पब्लिसिस ग्रुपच्या ग्लोबल डिलिव्हरी (PGD) च्या सीईओ म्हणून दाखल झाली आहे.

मयूरी कांगोची कथा एखाद्या चित्रपटाच्या स्क्रीप्टपेक्षा कमी नाही. तिची आई एक प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट होती आणि मुंबईत आईसोबत वेळ घालवताना तिची भेट दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्याशी झाली. मिर्झा यांनी तिला १९९५ साली त्यांच्या 'नसीम' चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली. त्यावेळी बारावीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या, त्यामुळे तिने ही ऑफर नाकारली, पण नंतर तिने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने दिग्दर्शक महेश भट यांचे मन जिंकले, ज्यांनी तिला १९९६ च्या 'पापा कहते हैं' चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर दिली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, पण मयूरीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तिने 'बेताबी', 'होगी प्यार की जीत', 'वंशी' आणि 'बादल' अशा अनेक चित्रपटांत काम केले. 'क्या हादसा क्या हकीकत', 'करिश्मा', 'कुसुम' आणि 'रंगोली' यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही तिने काम केले.

बॉलिवूडमधून संन्यास घेत अमेरिकेला झालेली स्थायिक
जेव्हा मयूरीचे अभिनयाचे करिअर यशाच्या शिखरावर होते, तेव्हा तिने सर्व काही सोडून एक वेगळाच मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये, तिने एनआरआय आदित्य धिल्लों यांच्याशी लग्न केले आणि ती अमेरिकेला गेली. तिथे तिने आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये तिने न्यूयॉर्कच्या बरुच कॉलेजमधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीएची पदवी मिळवली. तिची पहिली नोकरी 360i नावाच्या एका अमेरिकन डिजिटल मार्केटिंग कंपनीमध्ये असोसिएट मीडिया मॅनेजर म्हणून होती. त्यानंतर, २००९ मध्ये त्या न्यूयॉर्कमधील रिजोल्यूशन मीडियामध्ये सुपरवायझर बनली आणि २०१० मध्ये डिजिटासमध्ये असोसिएट डायरेक्टर (मीडिया) म्हणून काम केले, जिथे त्यांनी डिजिटल स्ट्रॅटेजी आणि मीडिया प्लानिंगमध्ये कौशल्य मिळवले.

२०१२ साली अभिनेत्री परतली भारतात
२०१२ मध्ये मयूरी भारतात परतली आणि झेनिथमध्ये चीफ डिजिटल ऑफिसर म्हणून पाच वर्षे काम केले. त्यानंतर, त्या पब्लिसिस ग्रुपच्या परफॉर्मिक्समध्ये मॅनेजिंग डायरेक्टर बनली. २०१९ मध्ये मयूरी यांनी गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड-एजन्सी पार्टनरशिप्स म्हणून एक मोठे पाऊल टाकले, जिथे त्यांनी जगातील प्रमुख जाहिरात नेटवर्कसोबतची भागीदारी सांभाळली. ऑगस्ट २०२४ मध्ये, ती गुगलमध्ये एआय, मार्टेक आणि मीडिया सोल्यूशन्स @MPTची इंडस्ट्री हेड बनली.

आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
२५ ऑगस्ट २०२५ रोजी मयूरी कांगोने त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर एक पोस्ट शेअर करून आपल्या नवीन जबाबदारीची घोषणा केली. तिने लिहिले की, ''मला आनंद आहे की मी पुन्हा एकदा पब्लिसिस ग्रुपसोबत जोडली जात आहे, यावेळी ग्लोबल एक्झिक्युटिव्ह लीडरशिप टीमचा भाग म्हणून. या भूमिकेत, मी जागतिक स्तरावर मीडिया, टेक आणि डिजिटल सोल्यूशन्सला आकार देईन आणि एआयच्या वापराला अधिक बळकटी देईन. यासोबतच, मी इंडिया डिलिव्हरी सेंटरची सीईओ म्हणूनही काम करेन.'' तिने पुढे लिहिले, ''येथे परत येऊन खूप छान वाटत आहे. मी माझ्या टीमसोबत काम करण्यासाठी, नवीन शोध लावण्यासाठी आणि ग्राहकांसाठी प्रभावी परिणाम मिळवण्यासाठी उत्सुक आहे.''

Web Title: 'Papa Kehte Hai' fame actress Mayoori Kango quits Google job; now becomes CEO of Publicis Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.