अमिताभ बच्चन यांच्या हट्टापायी भारतात ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा झाली पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 05:36 PM2021-12-13T17:36:16+5:302021-12-13T17:37:35+5:30

सध्या चर्चा आहे ती ‘मिस युनिव्हर्स’ या सौंदर्य स्पर्धेची. होय, तब्बल 21 वर्षानंतर हरनाज संधूच्या रूपात ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब भारताला मिळाला. याच निमित्ताने एका सौंदर्य स्पर्धेची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

Miss world competition in 1996 was organised by his company Amitabh Bachchan Corporation Limited ABCL |  अमिताभ बच्चन यांच्या हट्टापायी भारतात ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा झाली पण...

 अमिताभ बच्चन यांच्या हट्टापायी भारतात ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा झाली पण...

googlenewsNext

सध्या चर्चा आहे ती ‘मिस युनिव्हर्स’ या सौंदर्य स्पर्धेची. होय, तब्बल 21 वर्षानंतर हरनाज संधूच्या रूपात ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब (Miss Universe Harnaaz Sandhu) भारताला मिळाला. हरनाज 70 वी ‘मिस युनिव्हर्स’ ठरली आणि भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. याच निमित्ताने एका सौंदर्य स्पर्धेची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, आपल्या भारतात अशीच एक सौंदर्य स्पर्धा झाली होती आणि या सौंदर्य स्पर्धेने अमिताभ बच्चनचं ( Amitabh Bachchan) दिवाळं काढलं होतं. विशेष म्हणजे, या सौंदर्य स्पर्धेत आज अमिताभ यांची सून असणारी ऐश्वर्या राय जज होती.

होय, तर ही गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील. 1996 साली अमिताभ बच्चन यांनी अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करून भारतातील बेंगळुरू येथे ‘मिस वर्ल्ड’ (Miss world ) ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती.  बिग बींनी एबीसीएल ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा आयोजित करण्याचं शिवधनुष्य उचललं. अमिताभचा दरारा होताच. शिवाय ही स्पर्धा अगदी भव्यदिव्य करण्याचा अमिताभ यांचा इरादा होता. आयोजक यावरच भाळले आणि ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा आयोजनाचं कंत्राट अमिताभ यांच्या कंपनीला मिळाला.

‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा भारतात होणार म्हटल्यावर काही जण खूश्श होते. पण काही संस्कृतीरक्षकांनी या स्पर्धेला जोरदार विरोध केला. ही स्पर्धा भारतीय संस्कृतीला धोका आहे, अशी ओरड सुरू झाली. हा कदाचित पहिला ‘अपशकुन’ होता. पण अमिताभ यांचा इरादा पक्का होता. स्पर्धा होणार म्हणजे होणार, यावर ते ठाम होते. या स्पर्धेसाठी अमिताभ यांनी कॅनरा बँकेकडून 14 कोटींचं कर्ज घेतलं आणि इथूनच अमिताभ यांच्या कंपनीची वाताहत सुरू झाली. स्पर्धा तर झाली. पण या स्पर्धेसाठी घेतलेलं 14 कोटींचं कर्ज काही अमिताभ यांना फेडता आलं नाही. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी अलाहाबाद बँकेतून आणखी 8 कोटींचं कर्ज घेतलं. मग काय, एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज काढायचं, असं करता करता अमिताभ यांच्या कंपनीवर  90 कोटींचं कर्ज चढलं आणि अखेर कंपनीचं दिवाळं निघालं.  

 त्या काळात अमिताभ यांनी प्रचंड अपमान सहन केला. प्रचंड मन:स्ताप भोगला.  देणेकरी पैशांसाठी तगादा लाचत होते. मीडियामध्ये टीका होत होती. घरची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती. परिस्थिती इतकी वाईट होती की, अभिषेकचं विदेशातील शिक्षण झेपत नव्हतं म्हणून त्यालाही शिक्षण सोडून मायदेशी परतावं लागलं होतं. अमिताभ डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कर्जात बुडाले होते.सिमी ग्रेवालने घेतलेल्या मुलाखतीत अमिताभ जे काही बोलले होते, त्यावरून त्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना यावी. त्याकाळी जर मला कोणी फरशी पुसायला सांगितलं असतं तर मी पैशांसाठी ते देखील केलं असतं  इतकी माझी परिस्थिती बेकार होती, असं अमिताभ त्या मुलाखतीत म्हणाले होते. पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहेच...

Web Title: Miss world competition in 1996 was organised by his company Amitabh Bachchan Corporation Limited ABCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.