सचिनच्या कोचकडून शिकले, कपिल देवने दिली होती शाब्बासकी; मग महेश मांजरेकरांनी क्रिकेट का सोडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:03 PM2021-08-16T14:03:07+5:302021-08-16T14:17:37+5:30

Mahesh Majrekar Birthday : अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते तसचं लेखक महेश मांजरेकर यांचा आज वाढदिवस...

mahesh majrekar used to be cricketer played with sachin tendulkar trained by ramakant achrekar | सचिनच्या कोचकडून शिकले, कपिल देवने दिली होती शाब्बासकी; मग महेश मांजरेकरांनी क्रिकेट का सोडलं?

सचिनच्या कोचकडून शिकले, कपिल देवने दिली होती शाब्बासकी; मग महेश मांजरेकरांनी क्रिकेट का सोडलं?

googlenewsNext
ठळक मुद्दे2018 मध्ये ‘द वीक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अन्य एका मुलाखतीत महेश यांनी क्रिकेट सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. 

महेश मांजरेकर  (Mahesh Majrekar ) यांना आज कोण ओळखत नाही. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. मराठीसह बॉलिवूडमध्येही त्यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वास्तव’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. याच महेश मांजरेकरांना एकेकाळी क्रिकेटर व्हायचं होतं.  पण असं काहीतरी घडलं की महेश यांनी क्रिकेट सोडून अभिनय क्षेत्राचा रस्ता धरला. महेश मांजरेकर यांनी स्वत: याबद्दल सांगितलं होतं.
वाचून आश्चर्य वाटेल पण महेश यांनी भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंसोबत क्रिकेट खेळलं. लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित यांच्यासोबत क्रिकेटच्या मैदानावर सराव केला. इतकंच नाही तर क्रिकेटचा ‘देव’ सचिन तेंडूलकरला घडवणा-या रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले. आचरेकर महेश यांचे प्रशिक्षक होते.

2010 मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत महेश यावर बोलले होते. ‘ माझा भाऊ शैलेश आणि बहीण देवयानी दोघेही क्रिकेट खेळायचे. त्यामुळे मलाही क्रिकेटची गोडी लागली. लहान असताना प्रत्येकाला फलंदाजी करायला आवडते. मलाही आवडायची आणि फलंदाज व्हायचंच माझं स्वप्नं होतं. त्यासाठी मीआचरेकर सरांकडून व्यावसायिक प्रशिक्षण घेत होतो,’ असं त्यांनी सांगितलं होतं.

मग फलंदाज व्हायचं स्वप्नं कसं भंगलं तर याच मुलाखतीत महेश यांनी त्याचाही उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, ‘एका चॅरिटी सामन्यात मी सचिनबरोबर शतकी भागीदारी केली होती. माझा खेळ पाहून  कपिल देव यांनीही माझं कौतुक केलं होतं.  मी त्यावेळी क्रिकेट क्षेत्रात नवखा होतो आणि त्या सामन्यात माझ्या संघात मोठ मोठे खेळाडू होते. त्यामुळे माझी फलंदाजी येईल की नाही याची खात्री नव्हती. मी हळूच सचिनजवळ गेलो आणि मला बॅटिंग करायचीय, असं त्याच्याच्या कानात  म्हणालो. त्यानंतर  अनिल आणि मी डावाची सुरुवात केली. अनिल लवकर आऊट झाला. मग सचिन आला. आम्ही दोघांनी 134 धावांची भागीदारी केली. त्या सामन्यात मी 52 धावा केल्या.  याच सामन्यात मी कपिलदेवसारख्या खेळाडूविरुद्ध मोठे शॉट्स खेळले. कपिल सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी माझं कौतुकही केलं .

2018 मध्ये ‘द वीक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अन्य एका मुलाखतीत महेश यांनी क्रिकेट सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. 
 त्यांनी सांगितलं होते की, ‘आचरेकर सरांची शैली वेगळी होती. आचरेकर सर काही ऐकून घेत नसतं. काय बरोबर आहे, हे त्यांना नेहमी कळायचं. मी बॉलिंग करावी, असं त्यांना वाटायचं. पण मला तर फलंदाज व्हायचं होतं. अखेर मी क्रिकेटचं सोडलं.’
क्रिकेट सोडल्यानंतर अनेक वर्षांनी महेश मांजरेकर यांची चित्रपटसृष्टीत एन्ट्री झाली. मग काय, हे क्षेत्र ही त्यांनी गाजवलं.  

Web Title: mahesh majrekar used to be cricketer played with sachin tendulkar trained by ramakant achrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.