कामावर निष्ठा हेच यशाचे गमक -मोनाली ठाकुर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 13:18 IST2018-05-05T07:48:46+5:302018-05-05T13:18:46+5:30
-रवींद्र मोरे पश्चिम बंगालमध्ये संगीताचा वारसा असलेल्या घराण्यामध्ये जन्मलेल्या व पंडित अजोय चक्रबर्ती यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतलेल्या मोनाली ...
.jpg)
कामावर निष्ठा हेच यशाचे गमक -मोनाली ठाकुर !
पश्चिम बंगालमध्ये संगीताचा वारसा असलेल्या घराण्यामध्ये जन्मलेल्या व पंडित अजोय चक्रबर्ती यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतलेल्या मोनाली ठाकुर यांनी आजवर अनेक बंगाली व बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत. गायनाबरोबरच अभिनयामध्ये देखील मोनाली कार्यरत असून त्यांनी अनेक बंगाली चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. एकंदरीत मोनाली यांचा आजपर्यंतच्या प्रवासाबाबत सीएनएक्सने घेतलेला मुलाखत स्वरुप वृत्तांत...!
* २००८ मधील रेस चित्रपटातून गायन क्षेत्रात करिअरला सुरुवात केली, आजपर्यंतचा अनुभव कसा वाटला?
- एवढा मोठा चांगला अनुभव आला आहे की तो थोडक्यात सांगता येणार नाही. आजपर्यंतच्या प्रवासात बऱ्याच लोकांना भेटली, त्यांच्याकडून बरेच काही शिकायलाही मिळाले. विशेष म्हणजे आयुष्य जगण्याची कला या क्षेत्रातून अवगत झाली, जी मला नेहमी प्रेरित करत असते.
* ‘मोह मोह के धागे...’ या गाण्यासाठी आपणास नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, याबाबत काय सांगाल?
- मी विचार देखील केला नव्हता की, मला हा अवॉर्ड मिळेल. विशेष म्हणजे हा अवॉर्ड मिळणार आहे, हे अगोदर कळतही नाही. तो अचानक जाहिर होतो. हा अवॉर्ड जाहिर झाल्यानंतर तर माझी आईच्या डोळ्यात चक्क आनंदाश्रू तराळले. आणि मलाही गगनात मावेनासा आनंद झाला होता. या क्षेत्रात काम करत असनाता येणाऱ्या प्रत्येक संकट समयी आई-वडिलांनी साथ दिली, त्याचीच प्रचिती म्हणजे हा अवॉर्ड होय. याने मला पुढील वाटचालीस नेहमी प्रोत्साहन मिळत असते.
* गायन क्षेत्रात करिअर करताना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
- प्रत्येक क्षेत्रात आवाहने आहेतच. त्यांच्यावर मात केल्यास आणि आपल्या कामावर निष्ठा ठेवल्यास यश हे नक्की मिळते. आपल्या मनात नेहमी आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत, त्याचाच विचार असायला हवा. त्यासाठीची नेहमी धडपळ, जिद्द, मेहनतीची तयारी असल्यास येणाऱ्या प्रत्येक समस्यांवर आपण मात करु शकतो आणि यशस्वी होऊ शकतो.
* तुमच्या ‘तमन्ना’ या गाण्याबाबत काय सांगाल?
- या गाण्याबाबत मी खूपच उत्साही असून पहिल्यांदाच स्वतंत्र गाणे गाण्याचे धाडस करत आहेत. ‘तमन्ना’ हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून इंटरनॅशनल म्युझिक प्रोड्युसर बेर्ट एलियट यांनी प्रोड्युस केले आहे. विशेष म्हणजे हे गाणे युट्यूब चॅनेलवर रिलीज होत आहे. हे गाणे म्हणजे मनातील आशा, आकांशा पूर्ण करण्याची प्रेरणा होय. मी देखील माझ्या गायन कलेला जीवन मानले असून जेव्हा मला मनसोक्त जगायचे असते तेव्हा गाणे गाते आणि त्याच्या जोडीला डान्सही करते.
* या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना काय सल्ला द्याल?
- कोणत्याही क्षेत्रात करिअर करणे आणि त्यातही यशोशिखर गाठणे खूपच कठीण असते. मात्र कामावर निष्ठा आणि संयम ठेवावा. थोडथोड्या संकटांनी खचून न जाता अविरत प्रयत्न सुरु ठेवावे. विशेष म्हणजे आपले मन योग्य ठिकाणीच केंद्रित व्हायला हवे. या क्षेत्रातही प्रयत्नांची पराकाष्ठा खूप महत्त्वाची ठरते. संयम आणि स्वत:वर विश्वास ठेवल्यास या क्षेत्रात यश मिळविणे कठीण नाही.