मनोज साकारणार केजरीवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 00:29 IST2016-10-23T22:15:27+5:302016-10-24T00:29:11+5:30
राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार 3’या चित्रपटात मनोज वाजपेयी एक जबरदस्त भूमिका करणार आहे. मनोज वाजपेयी साकारणारी भूमिका ...

मनोज साकारणार केजरीवाल!
मुंबई येथे सुरू असलेल्या ‘18 व्या मामी चित्रपट महोत्सवा’दरम्यान मीडियाशी बोलताना मनोज वाजपेयी यांनी ही माहिती दिली. मनोज म्हणाला. राम गोपल वर्मा यांच्याशी माझी जुणी ओळख आहे. आम्ही सोबत अनेक चित्रपट केले आहे. जेव्हा रामूने मला ‘सरकार 3’ मधील एका भूमिकेबद्दल विचारले तेव्हा मी नकार देऊ शकलो नाही. या चित्रपटात मी गोविंद देशपांडेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘सरकार ३’मध्ये अमिताभ बच्चन सुभाष नागरेची प्रमुख भूमिका साकारताना दिसेल तर यामी गौतमचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. मनोजने याआधी राम गोपाल वर्मासोबत ‘सत्या’, ‘कौन’ आणि ‘रोड’ यांसारखे सिनेमे केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सरकार 3’मधील मनोज वाजपेयी करणारी भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तित्वाने प्रभावित आहे. नव्या राजकीय नेतृत्वामध्ये अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख केला जातो. केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आंदोलनातून व कामातून प्रेरणा घेऊन ही भूमिका रचण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.
मामी चित्रपट महोत्सवात मनोजचा नीरज पांडे दिग्दर्शित ‘आऊच’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला यासाठी त्याने खास हजेरी लावली होती. मनोज म्हणतो, ‘लघुपटात काम करताना मजा येते. लघुपटात काम करताना फारसे मानधन मिळत नाही तरीही समाधान मात्र नक्कीच मिळते’. 2016 मध्ये मनोज ‘अलिगढ’, ‘ट्रफिक’ व ‘बुधिया सिंग : बर्न टू रन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले असून या सर्वच चित्रपटातील त्याच्या भूमिकेची प्रशंसा झाली.