इरफान खानचा मुलगा बाबीलला आवरले नाहीत अश्रू, पुरस्कार सोहळ्यातच कोसळले रडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 16:54 IST2021-04-10T16:53:49+5:302021-04-10T16:54:18+5:30
पुरस्कार सोहळ्यात इरफानचा मुलगा बाबीलला आपले अश्रू आवरले नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इरफान खानचा मुलगा बाबीलला आवरले नाहीत अश्रू, पुरस्कार सोहळ्यातच कोसळले रडू
इरफान खानने एकापेक्षा एक हिट चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. इरफानचे गेल्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनाच्या काही महिने आधी अंग्रेजी मीडियम हा त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील इरफानच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी त्याला नुकताच एक पुरस्कार मिळाला. त्याचा हा पुरस्कार त्याच्या मुलाने स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यात इरफानचा मुलगा बाबीलला आपले अश्रू आवरले नाहीत.
नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफानला बॉलिवूडकडून आदरांजली वाहाण्यात आली. तसेच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. इरफानविषयी कलाकारांनी आपली मतं व्यक्त केल्यानंतर त्याचा मुलगा बाबीलला रडू कोसळले. या पुरस्कार सोहळ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत आयुषमान खुराणा इरफान खानच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. हे ऐकून केवळ बाबीलच्याच नव्हे तर राजकुमार राव, अनुराग बासू यांच्या डोळ्यांत देखील पाणी आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
आयुषमान सांगत आहे की, निधनानंतरही अनेक कलाकारांची आपण आवर्जून आठवण काढतो. पण इरफान यांच्याबद्दल आपल्या मनात जो आदर आहे तो खूपच कमी जणांबद्दल असतो. त्यानंतर राजकुमार राव आपले मत व्यक्त करतो. तो सांगतो की, मला इरफान सरांकडून खूप काही शिकायला मिळाले. केवळ मीच नाही तर भविष्यातील अनेक पिढ्या देखील त्यांच्या अभिनयातून शिकतील.
त्यानंतर राजकुमार पुरस्कार स्वीकारण्यासाठी बाबीलला स्टेजवर बोलवताना दिसत आहे. बाबील भारावून म्हणत आहे की, मी काय बोलायचे हे ठरवले नव्हते. तुम्ही सगळ्यांनी माझे खुल्या हृदयाने स्वागत केले, यासाठी मी तुमचा आभारी आहे. आपण पुढचा प्रवास सगळ्यांनी मिळून एकत्र करूया... एवढेच मी सांगेन...