पत्नीसाठी इरफान खानला पुन्हा जगायचं होते, पण काळाने केला घात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 13:46 IST2020-04-29T13:43:37+5:302020-04-29T13:46:21+5:30
पत्नी सुतापाबद्दल तो भरभरून बोलला होता.

पत्नीसाठी इरफान खानला पुन्हा जगायचं होते, पण काळाने केला घात
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अचानक आलेल्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडच्या कलाकारांना धक्का बसला आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. इरफान गेली 2 वर्षे न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होता. 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा इरफानचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान मुंबई मिररला त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याचे आजारपण व खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
पत्नी सुतापाबद्दलही तो भरभरून बोलला होता. सुतापाबद्दल काय सांगू. आठवड्याचे सातही दिवस 24 तास ती माझ्यासोबत होती. उपचाराच्या काळात तिने अगदी लहान बाळासारखी माझी काळजी घेतली. आजही घेतेय. मी आज जिवंत आहे, याचे कारण ती आहे. मला जीवदान मिळालेच तर फक्त आणि फक्त तिच्यासाठी जगायला मला आवडेल, असे तो म्हणाला.
आयुष्याचा हा काळ माझ्यासाठी एका रोलर-कोस्टर राईडसारखा आहे. यात आपण थोडे रडतो आणि अधिक हसतो, तसेच काही. या काळात मी भयंकर अस्वस्थता अनुभवली. पण कुठेतरी त्यावर नियंत्रणही मिळवले. मी माझ्या जवळच्या व्यक्तिंसाठी जगतो, जगतोय,’ असे त्याने सांगितले होते.