सिनेमांवरही ‘ब्लॅक मनी’चा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 21:42 IST2016-11-09T21:28:22+5:302016-11-09T21:42:25+5:30

काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार या अर्थव्यवस्थेला खिळखिळ्या करणाºया तीन प्रमुख गोष्टींचे उच्चाटन करण्याचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र ...

Influence of Black Money on Movies | सिनेमांवरही ‘ब्लॅक मनी’चा प्रभाव

सिनेमांवरही ‘ब्लॅक मनी’चा प्रभाव

ळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार या अर्थव्यवस्थेला खिळखिळ्या करणाºया तीन प्रमुख गोष्टींचे उच्चाटन करण्याचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने देशभर एकच खळबळ उडाली आहे. कोणी या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी निराशाही व्यक्त केली. परंतु ‘ब्लॅक मनी’ अर्थात काळा पैसा हा नेहमीपासूनच चर्चेचा विषय राहिला आहे. राजकारणाप्रमाणेच सिनेमा जगतातही ‘ब्लॅक मनी’चा प्रभाव राहिला असून, वेळोवेळी सिनेमाच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशाच काही ‘ब्लॅक मनी’वर आधारित असलेल्या सिनेमांचा घेतलेला हा आढावा...


शिवाजी द बॉस
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवाजी द बॉस’ या तामिळ चित्रपटात काळ्या पैशाची कथा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. एका राजकारण्याने भष्टÑाचाराच्या माध्यमातून जमविलेला ब्लॅक मनी कशा पद्धतीने व्हाइट करून त्याचा एका शैक्षणिक संस्थेसाठी वापर केला जातो याची कथा चित्रपटात दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर चुकविण्याच्या प्रयत्नात हा राजकारणी जमविलेली काळी माया दडपण्यासाठी चक्क घरावरील कौलांचा वापर करून देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा मारक ठरतो याचे विदारक चित्र सिनेमातून दाखविण्यात आले आहे. 


ब्लड मनी 
निर्माता मुकेश भट्ट यांच्या ‘ब्लड मनी’ या चित्रपटातदेखील ब्लॅक मनीसाठी अभिनेता कुणाल खेमू याची धडपड दाखविण्यात आली आहे. भरपूर पैसे कमविण्याच्या नादात तो कशा पद्धतीने काळी माया जमवितो. तसेच अवैध धंद्यांमध्ये तो कसा गुरफटला जातो, याची कथा चित्रपटातून दाखविण्यात आली आहे. चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिश्मा करू शकला नसला तरी, ब्लॅक मनी कमविताना गुन्हेगारी जगतात कशा पद्धतीने गुरफटत जावे लागते याचे वर्णन करण्याचा चित्रपटात प्रयत्न करण्यात आले आहे. 


खोसला का घोसला
दिबाकर बॅनर्जी यांचा ‘खोसला का घोसला’ जरी कॉमेडी चित्रपट वाटत असला तरी, चित्रपटात एका जमिनीच्या व्यवहारावरून केली जाणारी पैशाची हेराफेरी व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी आपलेही एक घर असावे यासाठी खोसला साहेब एक जमीन खरेदी करतात, तेथूनच चित्रपटाची कथा सुरू होते. चित्रपटात अभिनेता अनुपम खेर, बोमन इराणी, प्रवीण दबस, किरण जुनेजा, नवीन निश्चल आदिंच्या भूमिका आहेत. 


जन्नत
कुणाल देशमुख यांच्या ‘जन्नत’मध्येदेखील ब्लॅक मनीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सीरियल किसर इमरान हाशमी याची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात क्रिकेटवर सट्टा लावून कशा पद्धतीने पैशांची अफरातफर केली जाते हे दाखविले आहे. तसेच ब्लॅक मनी व्हाइट करताना करावी लागणारी धडपडही चित्रपटात दाखविली आहे. चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल करू शकला नसला तरी चित्रपटाचे गाणे हिट झाली होते.  


कॉर्पोरेट
मधुर भांडारकर यांच्या ‘कॉर्पोरेट’ या चित्रपटातून ब्लॅक मनीविषयीची केलेली मांडणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. केवळ राजकारणातच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्रातही कशा पद्धतीने काळी माया जमविली जाते हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. एक महत्त्वाकांक्षी तरुणी दोन कंपन्यांच्या वादात कशी मोहरा बनते. पुढे तिचे व्यक्तिगत आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे चित्रपटातून दाखविले आहे. बिपाशा बसू हिची भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 


काला बाजार
राकेश रोशन दिग्दर्शित १९८९ मध्ये आलेल्या ‘काला बाजार’ या चित्रपटात भ्रष्टाचार, गुन्हेगारीच्या माध्यमातून कशा पद्धतीने काळी माया जमविली जाते याची कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटात अनिल कपूर, जॉकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरकारी व्यवस्थेमध्ये समाजाचे शोषण करून कशा पद्धतीने भ्रष्टाचाराला चालना दिली जाते हे चित्रपटात दाखविले आहे. ९० च्या दशकात आलेल्या या सिनेमा सामाजिक व्यवस्थेबरोबरच राजकारणावरदेखील प्रभाव टाकला होता. 

Web Title: Influence of Black Money on Movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.