नायिकांनाही लागलेय गाण्याचे वेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 19:03 IST2016-10-23T19:03:09+5:302016-10-23T19:03:09+5:30
अनेक अभिनेत्रींनी चित्रपटात गाणी गायली असली तरी ‘न्यू जनरेशन’च्या अभिनेत्रींमध्ये गाण्याची जबरदस्त क्रेझ पहायला मिळते.
नायिकांनाही लागलेय गाण्याचे वेड
श्रद्धा कपूर : ‘रॉक आॅन 2’ या चित्रपटात फरहान व श्रद्धा आॅन स्क्रीन व प्लेबॅक सिंगर म्हणून पहायला मिळतील. गायिका म्हणून हा श्रद्धाचा पहिला चित्रपट नाही. याआधी तिने ‘एक व्हिलेन’, ‘बाघी’, ‘एबीसीडी 2’ व ‘हैदर’ या चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे श्रद्धाची आई शिवानी ही चांगली गायिका आहे तर तिचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे हे नामवंत गायक व विणावादक आहेत. यामुळे गायनाचा वारसा तिला मिळालाच आहे.
श्रृती हसन : अभिनेता कमल हसन व अभिनेत्री सारिकाची मुलगी श्रृतीने अभिनयात येण्यापूर्वी गायिका म्हणून प्रसिद्धी मिळविली होती. तिचा स्वत:चा एक बँड असून ती मुख्य गायिका आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर ‘लक’ या चित्रपटात तिने एक गाणे गायले होते. यानंतर ‘डी-डे’ व हिंदीत डब झालेल्या ‘थ्री’ या चित्रपटात गाणी गायली आहेत. तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम सिनेमातील ती आघाडीची अभिनेत्री व गायिका आहे.
प्रियांका चोप्रा : 2000 साली मिस वर्ल्डचा मुकुट मिळविल्यावर प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने गायिका व व्हाईस ओव्हर अॅक्टर म्हणून आपली ओळख मिळविली आहे. प्रियांका चोप्राने ‘मेरी कोम’ व ‘दिल धडकने दो‘ या चित्रपटात गाणी गायली आहेत. प्रियांकाच्या आई-वडिलांना गायनाची आवड होती. तिचे वडील ‘सारेगामापा’ या कार्यक्रमात प्रतिस्पर्धी म्हणून सहभागी झाले होते.
सोनाक्षी सिन्हा : शॉटगन शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षीची अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मुंबईतील नामवंत कॉश्चुम डिझायनर म्हणून ख्याती होती. फॅशन सोडून तिने अभिनयाला प्राधान्य दिले. सोबतच गायिका म्हणूनही आपली ओळख मिळविली. टी सिरीजने सोनाक्षीच्या आवाजातील ’आज मूड इश्कहोलिक है’ हा अल्बम रिलीज केला आहे. गायनातही नाव मिळविण्यासाठी तिची धडपड चालली आहे. म्हणूनच तिचा संगीत शिकण्यावर भर असल्याचे सांगण्यात येते.
आलिया भट्ट : बॉलिवूडची बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी आलिया भट्ट कोणत्याच बाबतीत मागे राहू इच्छित नाही. तिचा फॅशन सेंसही जबरदस्त आहे. ती चांगले गाते देखील. ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ व हायवे या चित्रपटासाठी तिने गाणी गायली आहेत. मात्र त्याचा वापर प्रमोशनल साँग्ज म्हणून करण्यात आला होता. लवकरच ती आपला अल्बम घेऊन येणार असल्याची माहिती मिळतेय.
परिणीती चोप्रा : गायकांच्या या लिस्टमध्ये आणखी एका गायिकेचे नाव येते ते म्हणजे परिणीती चोप्राचे. यशराज फिल्म्च्या आगामी मेरी प्यारी बिंदू या चित्रपटासाठी तिने आयुष्यमान खुरानासोबत गाणे गायले आहे. मी गायनाकडे पुन्हा वळतेय असे तिने सांगितले. परिणीती आपल्या करिअरबद्दल चांगलीच कॉन्शिअस असल्याने तिचा हा दावा खोटा ठरू शकत नाही असेच म्हणायला हवे.
माधुरी-राणी-ऐश्वर्या यांचाही प्रयत्न
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने ‘गुलाब गँग‘, राणी मुखर्जी हिने ‘गुलाम‘ व ऐश्वर्या राय हिने शाहरुख खानसोबतच्या ‘जोश’ या चित्रपटात गाणी गायली होती. राणी मुखर्जीचे आती क्या खंडाला हे गाणे तर चांगलेच हिट झाले होते. यापूर्वी श्रीदेवीचा आवाज ‘चांदनी’ या चित्रपटातील ‘लीड साँग‘मध्ये ऐकण्यास मिळाला होता.