बॉबी विज : अॅक्टिंग माझे पॅशन! मी यशस्वी होणारच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 15:11 IST2017-06-16T09:41:44+5:302017-06-16T15:11:44+5:30
- रूपाली मुधोळकर कलाकाराच्या घरात कलाकार जन्माला यावा, यात काहीही वावगे नाही. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत भक्कम स्थान निर्माण ...
.jpg)
बॉबी विज : अॅक्टिंग माझे पॅशन! मी यशस्वी होणारच!!
कलाकाराच्या घरात कलाकार जन्माला यावा, यात काहीही वावगे नाही. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत भक्कम स्थान निर्माण करणारी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या घरातही असाच एक ‘स्टार’ जन्माला आला आहे. होय, किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी दीपक बलराज विज. बॉबी लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करतोय. येत्या काही दिवसांत त्याच्या ‘जान तेरे नाम2’ या बॉलिवूड डेब्यू चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे. बॉलिवूडच्या वाटेवर आपले पहिले पाऊल टाकण्यासाठी सज्ज असलेल्या बॉबीशी दिलखुलास गप्पा, सारांश रूपात खास आपल्यासाठी...
प्रश्न : बॉबी, तुझ्या पहिल्या बॉलिवूड डेब्यू फिल्मबद्दल काय सांगशील?
बॉबी : ‘जान तेरे नाम2’ हा चित्रपट मी साईन केलेला आहे. हा चित्रपट ‘जान तेरे नाम’चा सीक्वल आहे. सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शन प्रोसेसमध्ये आहे. पहिला पार्ट सुपरहिट असल्याने दुसरा पार्टही सुपरहिटच असेल, असे मी आत्ताच सांगेल. ‘जान तेरे नाम’मध्ये म्युझिकल लव्हस्टोरी दाखवली गेली होती. ‘जान तेरे नाम2’मध्येही अशीच एक म्युझिक लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून माझ्या या चित्रपटाचे शूटींग सुरू होणे अपेक्षित आहे. मी या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे.
प्रश्न : बॉलिवूड डेब्यूसाठी काय आणि कशी तयारी केलीस?
बॉबी : गेल्या वर्षभरापासून मी ट्रेनिंग घेतोय. रोज सात ते आठ तास या ट्रेनिंगसाठी मी देतो. गत जानेवारीपासून मी कडक डाएटवर आहे. वर्कआऊट, मार्शल आर्ट, डान्स, मुव्ही फाईट अॅक्शन सिक्वेन्सेस असा सगळा दिवसभराचा कार्यक्रम असतो. मैदानात उतरण्यापूर्वी एकदम तयारीने उतरावे, हा माझा या तयारीमागचा उद्देश आहे.
प्रश्न : बॉलिवूडमध्ये रोज नवे चेहरे येतात. यातील अनेक जण यशस्वी झालेत. पण अयशस्वी होणाºयांची संख्या मोठी आहे. याचा काही दबाव जाणवतो का?
बॉबी : नक्कीच नाही. शेवटी तुम्ही काय विचार करता, हे महत्त्वाचे आहे. एका सकारात्मक विचारानिशी तुम्ही पुढे जाणार असाल तर यश नक्की आहे. माझा माइंड सेट एकदम पॉझिटीव्ह आहे. मला यश मिळणारच.
प्रश्न : अभिनेत्री किशोरी शहाणेचा मुलगा की बॉलिवूडचे नामवंत दिग्दर्शक दीपक बलराज विज यांचा मुलगा? कुठली ओळख तुला अधिक आवडते?
बॉबी : मी यापैकी कुठलीही एक ओळख निवडू शकत नाही. कारण मला मॉम- डॅड दोघांकडूनही वेगवेगळ्या गोष्टी मिळाल्यात. डॅड कमालीचे धाडसी आहेत. कुठल्याही गोष्टीला थेट जावून भिडण्याचा त्यांचा स्वभाव माझ्यात उतरलाय. मॉमकडून मला तिची एनर्जी, तिचे चार्मिंग नेजर मिळाले आहे. मी या दोघांच्या पोटी जन्माला आलो, हे माझे भाग्य आहे.
प्रश्न : आपल्याला अॅक्टिंगच करायचीय, हे तू कधी ठरवलसं?
बॉबी : मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. लहानपणापासून मॉम-डॅडसोबत सेटवर जाणे व्हायचे. बालकलाकार म्हणून मी चित्रपटात झळकलो. पुढे मॉडेलिंग, थिएटर, जाहिराती असे सगळे केले.तेव्हापासून आजपर्यंत अभिनयाची आवड रक्तात जणू भिणत गेली. खरे तर शिक्षण पूर्ण झाल्यावर मी कार्पोरेट जॉब करून पाहिला. पण नोकरी, बिझनेस हे सगळे आपल्यासाठी नाहीच. अॅक्टिंग हेच आपले पॅशन आहे, हे कळायला मला उशीर लागला नाही. अॅक्टिंग माझ्या जीन्समध्ये आहेच. त्यामुळे तेच माझे पॅशन बनले.
प्रश्न : स्टार किड्स असण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत, असे तुला वाटते?
बॉबी : स्टार किड्स असण्याचे फायदे- तोटे दोन्हीही आहेत. कदाचित स्टार किड्स असल्याने मला ‘ट्रेनिंग बेनिफिट्स’ सहज मिळेल. पण केवळ मी स्टारकिड्स आहे म्हणून मला यश मिळेल, असे नक्कीच नाही. भविष्यातील माझे यश केवळ आणि केवळ माझ्या मेहनतीवर अवलंबून आहे.
प्रश्न : फिल्म इंडस्ट्रीत गॉडफादर लागतोच, असे म्हटले जाते. तुझे याबद्दलचे मत काय?
बॉबी: गॉडफादरपेक्षा डेस्टिनी असे मी म्हणेल. नशीबाची खूप मोठी भूमिका आहे. तुमच्यातील प्रतिभा, तुमची कामावरची निष्ठा, तुमचा आत्मविश्वास, तुमची मेहनत आणि या सगळ्यांना नशीबाची जोड असे सगळे असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, यावर माझा पक्का विश्वास आहे.
प्रश्न : बॉलिवूडमधला तुझा रोल मॉडेल कोण?
बॉबी : हृतिक रोशन. मला हृतिक प्रचंड आवडतो. तो एक कम्प्लिट आॅलराऊंडर आहे. मलाही त्याच्याच मार्गाने जायला आवडेल.
प्रश्न : येत्या काळात कुठल्या अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करायला तुला सर्वाधिक आवडेल?
बॉबी : सध्या बॉलिवूडमधील बºयाच अभिनेत्री माझ्यापेक्षा सिनीअर आहेत. मला कुण्या अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करायला आवडेल, असे विचाराल तर मी आलिया भट्ट हिचेच नाव घेईल. ती कमालीची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे.
प्रश्न : चॉकलेट हिरो, रोमॅन्टिक हिरो, अॅक्शन हिरो अशा कुठल्या इमेजमध्ये स्वत:ला फिट बसवणे तुला आवडेल?
बॉबी : बॉलिवूडमध्ये कुणाला सुपरहिरो बनायचेय, कुणाला अॅक्शन हिरो बनायचे आहे. मला यापैकी काहीही बनायचे नाही. चांगली स्क्रिप्ट निवडणे आणि मला मिळालेल्या भूमिकेला न्याय देणे, एवढेच मला करायचेय. प्रेक्षकांनी माझ्या कामाला दाद द्यावी, मला एवढेच हवे आहे. मला फक्त चाहत्यांचा आवडता हिरो बनण्यात इंटरेस्ट आहे.
प्रश्न : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. तुला बायोपिक करायची संधी मिळाल्यास तू कुणाचे बायोपिक करशील?
बॉबी : माझी पर्सनॅलिटी अॅथलॅटिक आहे. त्यामुळे स्पोर्टमन, आर्मी मॅनचे बायोपिक करायला मला आवडेल.