‘कंगना राणौत कधी कधी मर्यादा ओलांडते...’; मनोज तिवारींनी ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ला सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:02 PM2022-02-09T12:02:18+5:302022-02-09T12:05:00+5:30
Manoj Tiwari On Kangana Ranaut: कंगना राणौत तुम्हाला कशी वाटते? असा प्रश्न मनोज तिवारी यांना विचारण्यात आला. यावर तिच्याबद्दल न बोललेलं बरं, असं मनोज तिवारी म्हणाले.
कंगना राणौत ( Kangana Ranaut)अलीकडे सिनेमांपेक्षा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत असते. गेल्यावर्षी या वादग्रस्त विधानांमुळे तिच्याविरोधात 100 हून अधिक गुन्हे दाखल झालेत. पण कंगना बोलायचं थांबली नाही. आता तिच्या या आक्रमक बोलण्यावर भाजपा नेते व गायक मनोज तिवारी यांनी आपलं मत मांडलंय. होय, केवळ मत नाही तर मनोज तिवारी (Manoj Tiwari)यांनी कंगनाला एक सल्लाही दिला आहे.
कंगना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाची कट्टर समर्थक मानली जाते. मुद्दा कुठलाही असो कंगना त्यावर बोलते. महाराष्ट्र सरकार सातत्याने टीका करताना दिसते. या पार्श्वभूमीवर ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या टॉक शोमध्ये मनोज तिवारी बोलले. त्यांना यावेळी कंगनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर कलाकारांचाही एक धर्म असतो, याची आठवण त्यांनी कंगनाला करून दिली.
काय म्हणाले मनोज तिवारी?
कंगना राणौत तुम्हाला कशी वाटते? असा प्रश्न मनोज तिवारी यांना विचारण्यात आला. यावर तिच्याबद्दल न बोललेलं बरं, असं मनोज तिवारी म्हणाले. पुढे ते म्हणाले, आक्रमक स्वभाव मान्य पण तुमचे विचार इतकेही स्फोटक नको ती ते थेट एखाद्यावर वार करतील. एका कलाकाराचाही आपला एक धर्म असतो. त्याचीही काही जबाबदारी असते. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात कंगनाची भूमिका योग्य होती. पण त्यानंतर महाराष्ट्र सरकारबद्दल तिची वागणूक योग्य नव्हती. थोडी मर्यादा राखली जायला हवी. तुम्हाला बोलायचं ते बोला, पण एखाद्याचा अनादार करणं ही आपली संस्कृती नाही. तुम्ही तुमच्या मर्यादेत राहून बोललं पाहिजे. कंगना बोलताना कधी कधी मर्यादा सोडून बोलते. मुख्यमंत्र्याच्या पदावर बसलेल्या व्यक्तिला आदर देणं आवश्यक आहे. हा त्याचा पदाचा आदर आहे. विरोध करा पण आदरपूर्वक करा, असं मनोज तिवारी म्हणाले.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना तर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. महाराष्ट्र सरकारसोबतचा तिचा पंगा, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण आणि आता शेतकरी आंदोलनावर ती ट्विटरच्या माध्यमातूनच व्यक्त झाली. यादरम्यान तिच्या अनेक ट्विटनी वादही ओढवून घेतले.