कोरोना व्हायरसला गांभीर्याने न घेणाऱ्यांना कार्तिक आर्यनने सुनावले, काहीच वेळात झाला व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 10:49 IST2020-03-20T10:47:25+5:302020-03-20T10:49:01+5:30
केवळ अडीज मिनिटांचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओचे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील कौतुक करत आहेत.

कोरोना व्हायरसला गांभीर्याने न घेणाऱ्यांना कार्तिक आर्यनने सुनावले, काहीच वेळात झाला व्हिडिओ व्हायरल
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे. पण काही केल्या आजही ट्रेन, बस, मेट्रोमधील गर्दी कमी होत नाहीये. एवढेच नव्हे तर लोक कुटुंबासोबत बाहेर फिरताना देखील दिसत आहे. या सगळ्याचा ताण यंत्रणेवर पडत आहे.
लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घरातून बाहेर पडू नये असे सांगणारा व्हिडिओ कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे कार्तिकने त्याच्या अंदाजात लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने घरी थांबावे, घरूनच काम करावे. एकदा हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला की, त्याला आटोक्यात आणणे कठीण असल्याचे कार्तिक सांगताना दिसत आहे. केवळ अडीज मिनिटांचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओचे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील कौतुक करत आहेत.
कार्तिकने काल संध्याकाळी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काहीच मिनिटांत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केवळ १३ तासांत ६४ लाख २० हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. वरुण धवन, कृति सॅनन, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर यांनी देखील कमेंटद्वारे हा व्हिडिओ खूपच छान असल्याचे कमेंटद्वारे म्हटले आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.