Babli Bouncer Movie Review : जाणून घ्या कसा आहे तमन्ना भाटियाची हटके भूमिका असलेला 'बबली बाउंसर' चित्रपट

By संजय घावरे | Published: September 23, 2022 05:43 PM2022-09-23T17:43:54+5:302022-09-23T17:45:32+5:30

Babli Bouncer Movie Review : स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाद्वारे लेडी बाउन्सरची मधुर स्टोरी सादर केली आहे.

Babli Bouncer Movie Review : Know how Tamannaah Bhatia starrer Babli Bouncer is | Babli Bouncer Movie Review : जाणून घ्या कसा आहे तमन्ना भाटियाची हटके भूमिका असलेला 'बबली बाउंसर' चित्रपट

Babli Bouncer Movie Review : जाणून घ्या कसा आहे तमन्ना भाटियाची हटके भूमिका असलेला 'बबली बाउंसर' चित्रपट

googlenewsNext

कलाकार : तमन्ना भाटिया, अभिषेक बजाज, साहिल वैद, सौरभ शुक्ला, सब्यसाची चक्रवर्ती, करण सिंग छाब्रा
दिग्दर्शक : मधुर भांडारकर
निर्माते : विनीत जैन, अमृता पांडे
शैली : कॉमेडी ड्रामा
कालावधी : एक तास ५८ मिनिटे
स्टार - दोन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

.........................
मुलीही मुलांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करू शकतात याचं आणखी उदाहरण या चित्रपटात पहायला मिळतं. अबला नारी आता बाऊन्सर बनून केवळ संरक्षणाचे धडे देत नसून संरक्षणही करत आहे. स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाद्वारे लेडी बाउन्सरची मधुर स्टोरी सादर केली आहे.

कथानक : बाउन्सरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीजवळील फतेहपूर असोलातील बबलीची (तमन्ना) ही कथा आहे. वडील (सौरभ शुक्ला) तरुणांना कुस्तीचे धडे देणारे असल्याने बबलीमध्येही त्यांचे गुण उतरले आहेत. मुलांप्रमाणं राहणीमान असणारी बिनधास्त बबली अभ्यासात मागे असते. लग्न करून संसार करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बबलीच्या आयुष्यात लंडन रिटर्न रोहन (अभिषेक बजाज) येतो. त्याच्या प्रेमात बबलीची स्वप्नच बदलून जातात. यासाठी ती दिल्लीतील पबमध्ये बाउन्सर म्हणून काम करू लागते. त्यानंतर तिला रोहन मिळतो की नाही याची कथा म्हणजे हा सिनेमा आहे.

लेखन-दिग्दर्शन : कमकुवत पटकथेचा चित्रपटाला फटका बसला आहे. मधुर जरी एक हुषार दिग्दर्शक असले तरी यातील पटकथेची मांडणी आणि एकूणच पैलू यापूर्वी बऱ्याचदा आलेले वाटतात. नावीन्यपूर्ण काहीतरी देण्याचा प्रयत्न हवा होता. बोलीभाषा, वातावरण, सादरीकरण या गोष्टींवर बारकाईनं लक्ष दिलं आहे. विशेषत: दक्षिणात्य सिनेमांसोबतच हिंदीतही नावलौकीक मिळवलेल्या सर्व कलाकारांनी हरियाणवी भाषेचा लहेजा अचूक पडकला आहे. मध्यंतरापूर्वी कथानक खूप संथ वाटतं. बबली केवळ वडीलांमाधील गुण तिच्यात उतरल्यानं पैलवान आहे. कधीही व्यायाम करताना दिसत नाही. मध्यंतरानंतर पबमध्ये एक घटना घडल्यानंतर थोडा उत्साह वाटतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. काही गंमतीशीर प्रसंग आहेत, पण तेही फार प्रभावी नाहीत. गाणी ठिक आहेत. संकलन आणि फाईट सीन्सही चांगले आहेत.

अभिनय : तमन्नानं अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या प्रकारे साकारलेली बबली यात आहे. तिनं या कॅरेक्टरसाठी घेतलेली मेहनत पडद्यावर दिसते. आपल्या नेहमीच्याच हटके शैलीत सौरभ शुक्लांनी वठवलेलं वडीलांचं कॅरेक्टर लक्षात राहणारं आहे. साहिल वैद्यनं रंगवलेला बबलीचा मित्र खूप छान झाला आहे. उच्चशिक्षीत तरुणाची भूमिका साकारताना अभिषेक बजाजनं आजच्या तरुणाईच्या मनातील काही वास्तववादी पैलू सादर केले आहेत. इतर सर्वांची चांगली साथ लाभली आहे.

सकारात्मक बाजू : सर्व कलाकारांचा अभिनय, तरुणींच्या स्वसंरक्षणाचा विचार, बोलीभाषा, वातावरण
नकारात्मक बाजू : नावीन्याचा अभाव, बऱ्याचदा सादर झालेले पटकथेतील पैलू, दिग्दर्शन, संथ गती
थोडक्यात : कमी शिक्षण असलेल्या तरुणीही स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात हा विचार मांडणारा चित्रपट जरी फारसा प्रभावी नसला तरी एकदा पहायला हरकत नाही.

Web Title: Babli Bouncer Movie Review : Know how Tamannaah Bhatia starrer Babli Bouncer is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.