Anek movie review: ईशान्येच्या राजकीय संघर्षावरचा ‘अनेक’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:15 PM2022-05-27T18:15:00+5:302022-05-27T18:22:03+5:30

Anek movie review: ईशान्येच्या राजकीय संघर्षावर भाष्य करतो आयुष्यमान खुरानाचा सिनेमा, बघावा की बघू नये? वाचा रिव्ह्यू

Ayushmann Khurrana, andrea kevichusa film Anek movie review in marathi | Anek movie review: ईशान्येच्या राजकीय संघर्षावरचा ‘अनेक’

Anek movie review: ईशान्येच्या राजकीय संघर्षावरचा ‘अनेक’

googlenewsNext

- रंजू मिश्रा

कलाकार - आयुष्यमान खुराणा, अँड्रिया केविचुसा, लोइतोंगबम डोरेन्द्र सिंह, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, मेघना मलिक
दिग्दर्शक - अनुभव सिन्हा
शैली- थ्रीलर
स्टार- 3 स्टार

सामाजिक आणि संवेदनशील मुद्यांवर सिनेमे बनवणारा अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) सारखा दिग्दर्शक आणि दरवेळी हटके विषय निवडणारा आयुष्यमान खुराणा (Ayushmann Khurrana) सारखा अभिनेता एखाद्या प्रोजेक्टसाठी हात मिळवतात, तेव्हा त्यातून काय साध्य होतं? याचं उत्तर देणारा ‘अनेक’ ((Anek))हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. आयुष्यमानचा हा सिनेमा ईशान्य भारतातील आसाम, मिझोरम, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा अशा राज्यांत जन्मलेला दहशतवाद आणि तेथील समस्यांवर भाष्य करतो. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटात फुटीरवादासारखा ज्वलंत मुद्दा आपल्या परिने समजवण्याचा प्रयत्न केला आहे. (Anek movie review)

कथा
अंडर कव्हर एजंट अमन (आयुष्यमान खुराणा) याला ईशान्येकडील राज्यात मिशनवर पाठवलं जातं. तो जोशुआच्या रूपात काम करतो आणि फुटीरवादी संघटनांच्या कारवायांवर लक्ष ठेवतो. एका मोठ्या फुटीरवादी संघटनेचा म्होरक्या टायगर सांगा (डोरेन्द्र) याच्यासोबत भारत सरकारला शांतता चर्चा हवी असते आणि जोशुआ यासाठी प्रयत्न करत असतो. याचदरम्यान, तो फुटीरवादी नेत्याची मुलगी असलेल्या एडोकडे(अँड्रिया केविचुसा) आकर्षित होतो. ईशान्य भागातील लोकांसारखीच एडो सुद्धा भेदभाव सहन करत असते.  पण तरिही भारतासाठी बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकायची महत्त्वाकांक्षा बाळगून असते. देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं एडोचं स्वप्न पूर्ण होतं का? जोशुआचं मिशन यशस्वी होतं का?  या प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुम्हाला सिनेमाच बघावा लागेल.

दिग्दर्शन  
मुल्क, आर्टिकल 15, थप्पड सारखे सिनेमे बनणाऱ्या अनुभव सिन्हांचा ‘अनेक’ हा सिनेम जरा जड आणि तेवढाच संथ आहे.   ईशान्येकडील राज्यातील राजकीय संघर्ष, तिथे जन्मलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील  समस्यांच्या रूपात एक संवेदनशील विषय यात मांडला आहे. इतक्या संवेदनशील आणि आव्हानात्मक विषयाची निवड केल्याबद्दल खरं तर अनुभव सिन्हा याचं कौतुक करायला हवं. पण प्रत्यक्ष चित्रपटात पटकथेपासून अनेक गोष्टी कमकुवत आहेत. एंटरटेनिंग फॅक्टर नसल्यानं सिनेप्रेमींना हा चित्रपट कंटाळवाणा व रटाळ वाटू शकतो. काही दृश्य गरजेपेक्षा जास्त अधिक लांबली आहेत. संगीतही सुमार आहे.

अभिनय
आयुष्यमान खुराणा एक गुणी अभिनेता आहे. या चित्रपटातही वाट्याला आलेली भूमिका त्याने अगदी चोख बजावली आहे. आयुष्यमान खुराणाचे हावभाव, त्याची देहबोली एकदम परफेक्ट आहे. त्याने अ‍ॅक्शनही केली आहे. एक अंडर कव्हर एजंटच्या रूपात आयुष्यमानच्या अभिनयाला दाद द्यावीच लागेल. एडोच्या भुमिकेत अँड्रिया केविचुसा हिने सुंदर काम केलंय. चित्रपटातील 70-80 टक्के कलाकार ईशान्येकडील आहे आणि सर्वांनी आपआपल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.

सकारात्मक बाजू
चित्रपटाचं शूटींग आसाम व मेघालयात झालं आहे. येथील निसर्ग सौंदर्याची अप्रतिम सिनेमेटोग्राफी आणि आयुष्यमानचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचे प्लस पॉइंट आहेत.

नकारात्मक बाजू
कमकुवत पटकथा, सुमार दर्जाचे सादरीकरण, कर्णमधूर संगीत आणि एंटरेटेनिंग फॅक्टरचा अभाव चित्रपट पाहताना प्रकर्षानं जाणवतो.

थोडक्यात
‘अनेक’ सारखे सिनेमे प्रत्येकासाठी नसतात. विषयाचं गांभीर्य समजत असाल तर आयुष्यमान आणि अनुभव सिन्हाच्या या चित्रपटाचं तुम्ही कौतुक कराल. दोघांची जुगलबंदी कदाचित तुम्हाला आवडेल. मात्र एंटरटेनमेंट म्हणून कोणी हा सिनेमा बघणार असेल तर त्याची निराशाच होईल.
 

Web Title: Ayushmann Khurrana, andrea kevichusa film Anek movie review in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.