अमिताभ बच्चन यांना पडली साऊथ चित्रपटांची भुरळ, त्यांच्या पहिल्या तमीळ चित्रपटाचे नाव आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 15:30 IST2019-01-08T15:28:10+5:302019-01-08T15:30:42+5:30
अमिताभ बच्चन लवकरच तमीळ सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमध्ये पार पडणार आहे.

अमिताभ बच्चन यांना पडली साऊथ चित्रपटांची भुरळ, त्यांच्या पहिल्या तमीळ चित्रपटाचे नाव आले समोर
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन तमीळ चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचे नाव नुकतेच समोर आले आहे. या सिनेमाचे नाव ‘महान : द ग्रेट मॅन’ असे असून उत्तराखंडमधील दून व आजूबाजूच्या परिसरात ३८ दिवसांत चित्रीकरण केले जाणार आहे.
अमिताभ बच्चन यांच्या तमीळ सिनेमाचे नाव आधी उयारनधा मनिधन ठेवणार असल्याची चर्चा होती. या सिनेमासाठी लोकेशन शोधण्यासाठी आलेल्या टीमने या चित्रपटाच्या नावाचा खुलासा केला आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप या चित्रपटाच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला नाही. पर्पल बुल एण्टरटेन्मेंटचे टेक्निकल व प्रोडक्शन टीम सध्या महान चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहरादून व इतर जिल्ह्यांचे सर्वेक्षण करत आहे.
निर्माता प्रकाश भट्ट यांनी मालदेवता, रानीपोखरी, कँप्टीफॉल, थानो व मसूरी या ठिकाणांचा सर्वे केला. याबाबत ते म्हणाले की, आमच्या टीमला उत्तराखंडमधील काही लोकेशन पसंतीस पडले आहेत. या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी आमची टीम खूप उत्सुक आहे. भट्ट यांनी एसजे सूर्या, दिग्दर्शक टी तमिलवन व सुजय शंकरवार यांच्यासोबत चित्रीकरणासाठी सर्वे केला.
या सिनेमात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार असून नुकतेच मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी प्रकाश भट्ट यांची भेट घेतली. यावेळी भट्ट यांना मदतीचे आश्वासनदेखील दिले. त्यांची ही भेट उत्तराखंडमध्ये चांगल्या सिनेमाचे चित्रीकरण व्हावे या उद्देशाने महत्त्वपूर्ण होती. आता या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका व सिनेमाच्या कथानकाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.