अभिनेत्री ते निर्माता प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 12:32 IST2017-07-05T07:02:28+5:302017-07-05T12:32:28+5:30
अबोली कुलकर्णी बॉक्स आॅफिसवर एकापाठोपाठ एक चित्रपट आपटल्यानंतर हुमा कुरैशीने आता एक बोल्ड निर्णय घेतलाय. ती भाऊ साकिब सलीमसोबत ...
.jpg)
अभिनेत्री ते निर्माता प्रवास!
बॉक्स आॅफिसवर एकापाठोपाठ एक चित्रपट आपटल्यानंतर हुमा कुरैशीने आता एक बोल्ड निर्णय घेतलाय. ती भाऊ साकिब सलीमसोबत मिळून स्वत:ची प्रोडक्शन कंपनी उभारणार आहे म्हणे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वत:ची प्रोडक्शन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. नव्या पिढीच्या अभिनेत्री या केवळ कलाकार म्हणून नव्हे तर ‘जॉब क्रिएटर’ म्हणूनही या क्षेत्राकडे पाहू लागल्या आहेत. वेगळी थीम, कथानक, प्लॉट यांच्यासह त्या नवीन संकल्पनांवर आधारित प्रोजेक्ट्स करू पाहत आहेत. पाहूयात, मग या अभिनेत्रींचा हा धाडसी प्रवास...
प्रियांका चोप्रा -सर्वन
‘क्वांटिको’, ‘बेवॉच’ या हॉलिवूड प्रोजेक्टसाठी काम करत असताना तिने स्वत:ची प्रोडक्शन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिची आई मधु चोप्रा हिच्यासोबत ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ नावाची प्रोडक्शन कंपनी तिने सुरू केली. तिने मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘सर्वन’ हा पंजाबी चित्रपट प्रोड्यूस केला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
ऋचा चढ्ढा - खुन आली चिठ्ठी
‘खुन आली चिठ्ठी’ या पंजाबी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून ऋचा चढ्ढाने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. चित्रपटाचे आगळे वेगळे कथानक, प्लॉट आणि थीमवर आधारित असून पंजाबमधील १९८०च्या दशकांतील खलिस्तान चळवळीमुळे सामान्य माणूस कसा भरडला गेला.. याचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे.
अनुष्का शर्मा - फिल्लौरी
उत्तम अभिनयाची जाण, संवाद, भूमिकेत समरस होऊन अभिनय साकारणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. तिने ‘एनएच १०’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात डेब्यू केला. तिचा हा चित्रपट हिट झाला होता. तसेच ‘फिल्लौरी’ चित्रपटातून तिने दिलजीत दोसांझ याच्या मुख्य भूमिकेत दुसरा चित्रपट प्रोड्यूस केला.
सोनम कपूर - बॅटल फॉर बित्तोरा
बॉलिवूडची मस्सकली सोनम कपूर ही सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत होती. ती म्हणजे ‘बॅटल फॉर बित्तोरा’ या कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून ती को-प्रोड्यूसर म्हणून भेटीला येणार आहे. सोनम कपूरची बहीण रिहा कपूर ही आता तिच्याच प्रोडक्शन हाऊसमधून ‘वीरें दी वेडिंग’ रिलीज करणार आहे.
टविंकल खन्ना - पद्मन
काही महिन्यांपूर्वी चर्चा होती की, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन हे दोघे आर. बल्की दिग्दर्शित एका चित्रपटात १० वर्षांनंतर दिसणार आहेत. ज्यात सोनम कपूर आणि राधिका आपटे या दोघी देखील असतील. टविंकल खन्ना ही ‘पद्मन’ हा चित्रपट प्रोड्यूस करणार होती. तिची प्रोडक्शन कंपनी ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’ या बॅनरअंतर्गत ती चित्रपट रिलीज करणार होती. तसेच तिने ‘सिंग इज ब्लिंग’,‘रूस्तुम’,‘फुगली’ असे अनेक चित्रपट तिने प्रोड्यूस केले आहेत.
पूजा भट्ट - ‘तमन्ना’
‘डॅडी’,‘दिल हैं के मानता नहीं’, ‘जख्म’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय साकारणारी अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट. दिग्दर्शन आणि निर्मिती या दोन्ही गोष्टींमुळे ती घरातूनच लाँच झाली. मात्र, १९९७ मध्ये ती ‘तमन्ना’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता म्हणून सर्वांसमोर आली. ‘फिशये नेटवर्क’ या बॅनरखाली तिने जवळपास १० चित्रपट साकारले. ‘दुश्मन’,‘जख्म’,‘जिस्म’ आणि ‘जिस्म २’ या चित्रपटांना तिने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमवून दिला.
प्रिती झिंटा - ‘इश्क इन पॅरिस’
मॉडेलिंग आणि अभिनय यांच्यापासून प्रिती झिंटाने करिअरला सुरूवात केली होती. ‘सोल्जर’,‘कल हो ना हो’ या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर खुप कमाई केली. त्यानंतर ती एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पौल यांच्यासोबत आयपीएल टीमची मालकीण बनली. मात्र तिने ‘इश्क इन पॅरिस’ या चित्रपटासाठी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. पण, चित्रपट आपटल्याने तिला फारसे यश मिळाले नाही. निर्माता होऊन चूक केली असे तिला नंतर वाटले.