सामाजिक संवेदनांची बोथट आणि उथळ मांडणी
By Admin | Updated: August 1, 2015 03:52 IST2015-08-01T03:52:21+5:302015-08-01T03:52:21+5:30
चारचौघांपेक्षा काही तरी अचाट कामगिरी करणारा किंवा अन्यायाविरोधात लढणारा माणूस दुसऱ्याच्या घरात असावा, अशी प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. असेच काही तरी वेगळे करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची

सामाजिक संवेदनांची बोथट आणि उथळ मांडणी
- राज चिंचणकर
चारचौघांपेक्षा काही तरी अचाट कामगिरी करणारा किंवा अन्यायाविरोधात लढणारा माणूस दुसऱ्याच्या घरात असावा, अशी प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. असेच काही तरी वेगळे करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची कथा ‘जाणिवा’ या चित्रपटात रंगवण्यात आली असून सामाजिक बांधिलकी, कायदा, न्यायव्यवस्था अशा विविध स्तरांवर ती हेलकावे घेते. वास्तविक, या चित्रपटाचा विषय तसा चांगला आहे; परंतु त्यात विविध गोष्टींची सरमिसळ झाली असून हा चित्रपट संवेदनांची बोथट मांडणी करण्याकडे झुकला आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला समीर हा मुलगा प्रचंड संवेदनशील मनाचा असतो आणि समाजात जे काही सुरू आहे, त्यावर त्याच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उमटतात. मनात जे येईल ते ताबडतोब कृतीत उतरवण्याचा त्याचा स्वभाव असतो. सतत न्यायाचा हात पकडणारा हा समीर एका घटनेमुळे इतका विचलित होतो की त्याची प्रतिक्रिया थेट मूर्त स्वरूप घेते. आसावरी पाटील या नर्सवर केलेल्या अत्याचारानंतर शिक्षा भोगून मोकळा सुटलेल्या नराधमाला समीर त्याच्या पद्धतीने सजा देतो आणि समीरचा न्यायव्यवस्थेशी लढा सुरू होतो. लोकशाही, न्यायदान, व्यवस्था, समाज, कुटुंब अशा अनेक बाबींना स्पर्श करत दिग्दर्शक राजेश रणशिंगे यांनी यात एक वेगळा विषय हाताळला आहे. अत्याचारग्रस्त महिलेचा संदर्भ दाखवताना यात अरुणा शानभाग यांच्या आयुष्याशी स्पष्ट साधर्म्य साधण्यात आले आहे. हाच धागा पकडत यातल्या नायकाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. पण या सगळ्याची मांडणी आश्वासक झालेली नाही. यात बराच वेळ कोर्टरूम ड्रामा आहे; परंतु त्याचा केवळ नाटकी खेळ झाल्याचे जाणवते. यातला पौगंडावस्थेतला नायक मनात आल्याप्रमाणे गुन्हेगाराला सजा देतो किंवा कोमात असलेल्या नर्सच्या वॉर्डमध्ये जाऊन तिची लाइफ सपोर्ट सिस्टीम काढून तिला इच्छामरण देतो, या गोष्टीही सहज पचनी पडणाऱ्या नाहीत. ज्याच्यावर या चित्रपटाचा भार आहे, तो या चित्रपटाचा नायक सत्या मांजरेकर (समीर) याची अभिनयक्षमता यात बऱ्यापैकी स्पष्ट होत गेली आहे. त्यामुळे या चित्रपटाचा डोलारा सांभाळण्याचे काम इतर कलाकारांवर येऊन पडले आहे. पण पटकथेत गडबड झाल्याने यातले अनुभवी कलावंतही चित्रपटाला तारून नेण्यात कमी पडले आहेत. किशोर कदम आणि रेणुका शहाणे या दोघांना कोर्टातले वकील रंगवताना दिलेला मुखवटा बेगडी वाटतो. पण रेणुका शहाणे यांनी त्यातही कडक परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. किरण करमरकर, इंदिरा कृष्णन यांच्यासह इतरही कलावंतांचा हातभार चित्रपटाला लागला आहे. चित्रपटातल्या जाणिवांच्या मांडणीला अजून ठोसपणे गांभीर्याचा स्पर्श झाला असता, तर एक चांगला विषय पटावर आणण्याचे क्रेडिट या चित्रपटाला गेले असते.