आदित्यसिंहच्या हृदयात आढळले ब्लॉकेज? पोलिसांनी नोकरासह तिघांचे जबाब नोंदविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:17 IST2023-05-24T09:17:12+5:302023-05-24T09:17:20+5:30
आदित्यचा नोकर, तसेच तो राहत असलेल्या आदर्श नगरमधील लष्करिया ग्रीन वूड अपार्टमेंट सोसायटीचा सुरक्षारक्षक आणि त्याला खासगी ब्लू बेल रुग्णालयात तपासून मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरचा जबाब ओशिवरा पोलिसांनी नोंदवला आहे.

आदित्यसिंहच्या हृदयात आढळले ब्लॉकेज? पोलिसांनी नोकरासह तिघांचे जबाब नोंदविले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता आणि मॉडेल आदित्यसिंह राजपूत (३३) याच्या नोकरासह तिघांचे जबाब ओशिवरा पोलिसांनी नोंदवले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या हृदयात ब्लॉकेज आढळले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नसून त्याच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा तपास अधिकारी करत आहेत.
आदित्यचा नोकर, तसेच तो राहत असलेल्या आदर्श नगरमधील लष्करिया ग्रीन वूड अपार्टमेंट सोसायटीचा सुरक्षारक्षक आणि त्याला खासगी ब्लू बेल रुग्णालयात तपासून मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरचा जबाब ओशिवरा पोलिसांनी नोंदवला आहे. तसेच त्याच्या जवळच्या मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या हृदयात ब्लॉकेज आढळले आहेत तसेच त्याचा मृत्यू हा नैसर्गिकच असल्याचे अद्यापच्या तपासात उघड झाले असून, याप्रकरणी कोणतीच संशयास्पद बाब निदर्शनास आलेली नाही, असे, पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, मंगळवारी सिद्धार्थ रुग्णालयात दुपारी अकराच्या सुमारास त्याचे शवविच्छेदन केल्यावर त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. त्याच्या अंत्यदर्शनासाठी अनेक टीव्ही कलाकारांनी गर्दी केली होती. त्याची आई रात्री उशिरा दिल्लीतून मुंबईत दाखल झाली.
काही दिवसांपासून आजारी होता
आदित्य (३३) हा सोमवारी अंधेरी येथील त्याच्या अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत बरी नव्हती. बाथरुममध्ये तो अचानक कोसळला.