छोट्या पडद्यावरचा मोठा प्रवास
By Admin | Updated: June 24, 2016 03:12 IST2016-06-24T03:12:49+5:302016-06-24T03:12:49+5:30
छोट्या पडद्यावरच्या कलाकारांचे करिअर हे काहीच वर्षांपुरते मर्यादित असते असे मानले जाते. छोट्या पडद्यावरील कलाकार हे ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध होतात

छोट्या पडद्यावरचा मोठा प्रवास
छोट्या पडद्यावरच्या कलाकारांचे करिअर हे काहीच वर्षांपुरते मर्यादित असते असे मानले जाते. छोट्या पडद्यावरील कलाकार हे ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध होतात. प्रेक्षक त्या कलाकारांच्या नव्हे तर त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडलेले असतात. त्यामुळे मालिका संपल्यानंतर काही वर्षांनी प्रेक्षक व्यक्तिरेखा आणि ते साकारत असलेले कलाकार या दोघांनाही विसरून जातात. तसेच मालिकांमध्ये रोज नेहमीच नवनवीन चेहरे पाहायला मिळत असतात. या सगळ्यामुळे छोट्या पडद्यावर तग धरून राहाणे हे कठीण मानले जाते. असे असूनही छोट्या पडद्यावर अनेक वर्षं राज्य करणारे अनेक कलाकार आहेत. अशा कलाकारांवर एक नजर टाकूया...
महेश ठाकूर
महेशने सैलाब या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला आता जवळजवळ १७ वर्षं पूर्ण झाले आहेत. या दरम्यान महेशने स्पर्श, थोडा है थोडे की जरुरत है, शरारत, तू तू मैं मैं यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. आजही तो छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. सध्या इश्कबाज या मालिकेत तो नकारात्मक भूमिका साकारताना दिसत
अली असगर
अली असगरने १९८७ साली एक दो तीन चार या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने इतिहास, दिल विल प्यार व्यारसारख्या मालिकांमध्ये काम केले. कहानी घर घर घर की या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्याने आतापर्यंत गंभीर, कॉमिक अशा सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी नाईट विथ कपिल या कार्यक्रमात आणि द कपिल शर्मा शोमध्ये अली साकारत असलेली नानी ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे.
रेणुका शहाणे
रेणुकाने सुरभी, सर्कस, इम्तिहान, सैलाब यांसारख्या अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आज इतक्या वर्षांनीदेखील तिच्या या मालिकांमधील भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. लग्नानंतर रेणुकाने मालिकांमध्ये काम करणे कमी केले असले तरी ती वर्षांतून एखादी तरी मालिका करते. काही महिन्यांपूर्वी ती कभी ऐसे गीत गाया करो या मालिकेत झळकली होती. तसेच सध्या ती कॉमेडीची बुलेट ट्रेन या मराठी मालिकेत परीक्षकाची भूमिका साकारत आहे.
सुमीत राघवन : सुमित १९८३ला आलेल्या फास्टर फेणे या मालिकेत सगळ्यात पहिल्यांदा झळकला होता. या मालिकेत त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या पहिल्याच मालिकेतील सुमितची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर त्याने महाभारत, तू तू मैं मैं, हद कर दी, यांसारख्या मालिकेत काम केले. साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेत त्याने साकारलेली साहिल साराभाई ही व्यक्तिरेखा खूपच गाजली होती. सध्या सुमीत बडी दूर से आए है या मालिकेत काम करत आहे.
पल्लवी जोशी
मिस्टर योगी, भारत एक खोज, मृगनयनी, आरोहण, जुस्तजू, अल्पविराम यांसारख्या अनेक मालिकेत पल्लवी जोशीने काम केले होते. तसेच अंताक्षरी, मराठी वाहिनीवरील सारेगमप या कार्यक्रमात तिने सूत्रसंचालनाची भूमिका साकारलेली आहे. तिच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला २० वर्षांहून अधिक वर्षं झाले असूनही ती आजही छोट्याा पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. सध्या ती मेरे आवाज ही पहचान है या मालिकेत काम करत आहे.
रमण त्रिखा
बनेगी अपनी बात, कुमकुम, मन यांसारख्या मालिकेत काम केलेल्या रमणचे फिमेल फॅन फॉलॉविंग मोठ्या प्रमाणावर होते. रमणने काही चित्रपटातही काम केले होते. पण त्याला मोठ्या पडद्यावर अपयश मिळाले. रमण गेली अनेक वर्षं मालिकांपासून दूर आहे.
निकी अनेजा
निकी अनेजाने गंभीर आणि कॉमिक अशा दोन्ही भूमिका खूप चांगल्यारितीने सादर केल्या होत्या. सी हॉक्स, बात बन जाये, अस्तित्व - एक प्रेम कहानी या तिच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. निकी लग्नानंतर युकेत स्थायिक झाली.
फिरदोस दादी
फिरदोस दादीने बनेगी अपनी बात, इम्तिहानसारख्या हिट कार्यक्रमात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. २०१० साली बंदिनी या मालिकेत तिने काम केले होते. पण त्यानंतर ती छोट्या पडद्यावर झळकली नाही.
प्राजक्ती देशमुख
प्राजक्ती देशमुखने सैलाब, थोडा है थोडे की जरुरत है यांसारख्या मालिकेत काम केले होते. गेली कित्येक वर्षं ती तिच्या कुटुंबियांसोबत इंडोनेशियामध्ये राहात आहे.