बेवॉचला सेन्सॉरची कात्री
By Admin | Updated: May 23, 2017 13:15 IST2017-05-23T13:15:06+5:302017-05-23T13:15:55+5:30
अमेरिकन मालिका क्वांटिकोनंतर बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बेवॉच या सिनेमातून ती हॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश करणार आहे

बेवॉचला सेन्सॉरची कात्री
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23- अमेरिकन मालिका क्वांटिकोनंतर बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बेवॉच या सिनेमातून ती हॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश करणार आहे. पण पीसीचा हा पहिलावहिला हॉलिवूड सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे..
सेथ गॉर्डन यांचं दिग्दर्शन असलेल्या बेवॉच या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ म्हणजेच अॅडल्ट सर्टिफिकेट दिलं आहे, तसंच सिनेमातील एकूण पाच दृश्यांवर कात्री चालवल्याचीही माहिती आहे. बेवॉच या सिनेमात अभिनेत्री प्रियांका चोप्रा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात ड्वेन जॉन्सन, झॅक अॅफ्रॉन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी याविषयीची भूमिका मांडली आहे. सिनेमामध्ये प्रियांकाच्या कोणत्याही दृश्याला कात्री लावली नाही. असं स्पष्टीकरण निहलानी यांनी दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात प्रियांकाने बिकीनी सिन दिले आहेत पण या बिकीनी सिनला कात्री लावली नाही, असंही निहलानी यांनी स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पहलाज निहलानी यांनी माहिती दिली आहे. तसंच ‘भारतीय सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शकांनी बिकिनीच्या मुद्द्याला जास्त महत्त्व देणं टाळावं. त्याऐवजी त्यांनी मॉरिशस आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर जावं..’, असा सल्लाही पहलाज निहलानी यांनी दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बेवॉच’मधील एका दृश्यावर आणि चार संवादांना कात्री लावण्यात आली आहे. १९८९ साली ‘बेवॉच’ नावाची एक टीव्ही मालिका होती. ही मालिका त्या काळी अतिशय लोकप्रियसुद्धा ठरली होती. बेवॉच हा सिनेमा याच मालिकेचा रिमेक आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या बेवॉच या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. पण सेन्सॉरच्या या भूमिकेविषयी आता प्रियांका तिचं मत मांडते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.