बर्वेचा भन्नाट स्टुडिओ
By Admin | Updated: August 13, 2016 04:56 IST2016-08-13T04:56:01+5:302016-08-13T04:56:01+5:30
अभिनेता सुनील बर्वे याने जुनी नाटके पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा ‘हर्बेरियम’द्वारे केलेला प्रयोग रसिकांना खूप आवडला होता. सुनील हर्बेरियममार्फत भविष्यात काय घेऊन येतोय,

बर्वेचा भन्नाट स्टुडिओ
अभिनेता सुनील बर्वे याने जुनी नाटके पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा ‘हर्बेरियम’द्वारे केलेला प्रयोग रसिकांना खूप आवडला होता. सुनील हर्बेरियममार्फत भविष्यात काय घेऊन येतोय, याची उत्सुकता रसिकांना लागली आहे. तसेच ‘अमर फोटो स्टुडिओ’ या त्याच्या आगामी नाटकाचीही सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड चर्चा आहे. या त्याच्या नाटकाविषयी सीएनएक्ससोबत सुनीलने मारलेल्या गप्पा...
‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती करण्याचा तू कसा विचार केला?
- अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी हे तिघे माझ्याकडे आले होते. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका करीत असताना आपण एखादे नाटक केले पाहिजे, अशा त्यांच्या नेहमी गप्पा रंगत असत. मालिका संपल्यानंतर नाटक करावे, असा त्यांचा विचार सुरू होता. नाटकाबाबत मी त्यांना काही मार्गदर्शन करावे, असे त्यांचे म्हणणे असल्याने ते मला भेटायला आले होते. त्या वेळी कोणत्या विषयावर त्यांना नाटक बनवायचे वगैरे काहीच त्यांच्या डोक्यात नव्हते. आम्ही भेटलो तेव्हा भारतातील-परदेशातील अनेक नाटकांवर आमच्या गप्पा रंगल्या आणि रंगभूमीवर आतापर्यंत सादर केल्या गेलेल्या नाटकांपेक्षा वेगळे नाटक बनवू या, यावर आमचे एकमत झाले. पण काही तरी वेगळे म्हणजे काय करायचे, हे आम्हाला सुचत नव्हते. आम्ही कित्येक दिवस यावर विचारच करीत होतो. एकदा मला अमेय, सखी आणि सुव्रत यांचा फोन आला, की त्यांची निपुण धर्माधिकारी याच्यासोबत काही चर्चा झाली आहे. मनस्विनीला काही तरी वेगळे लिहायला सांगू या, असे ठरले आहे आणि काहीच दिवसांत ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची कथा तिने आम्हाला ऐकवली व पहिल्या वाचनातच हा विषय आम्हाला प्रचंड आवडला. सगळ्याच वयोगटांतील लोकांना आपलासा वाटेल, असा या नाटकाचा विषय आहे.
‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचे सोशल मीडियामार्फत करण्यात आलेले प्रमोशन सगळ्यांनाच प्रचंड आवडले. या नाटकाच्या प्रमोशनसाठी तुम्ही जुन्या पासपोर्ट साइज फोटोचाच वापर करायचे का ठरवले?
- लहानपणीचा फोटो पाहिल्यावर नकळतच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू उमलते. तसेच तुम्हाला कोणी फेसबुकला जुना फोटो टाकण्यासाठी आव्हान दिले, तर तो फोटो शोधून अपलोड करण्यात एक वेगळीच मजा येते. यामुळेच ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या प्रमोशनची आमची कल्पना प्रचंड हिट झाली, असे मला वाटते. आणि विशेष म्हणजे, आमच्या नाटकाचे नाव हे स्टुडिओशी संबंधित असल्याने आम्ही प्रमोशनसाठी फोटोंचा वापर करायचे ठरवले. पूर्वी ज्या वेळी लोकांकडे मोबाइल, चांगल्या दर्जाचे कॅमेरे नव्हते, तेव्हा स्टुडिओत जाऊन फोटो काढले जात असत. आमच्या या प्रमोशन फंड्यामुळे लोकांच्या त्या आठवणींनाही नक्कीच उजाळा मिळाला असेल.
‘हर्बेरियम’मध्ये लोकांना जुनी नाटके पुन्हा पाहायला मिळाली होती. रसिकांना हा प्रयोग प्रचंड आवडला होता. हर्बेरियमचा नवा सीझन रसिकांच्या कधी भेटीला येणार आहे?
- हर्बेरियममार्फत पुन्हा काही तरी करायचे, असा विचार कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. २०१२मध्ये हर्बेरियममुळे अनेक जुनी नाटके प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाली; पण हर्बेरियम संपल्यानंतर अनेक निर्मात्यांनी जुनी नाटके रंगभूमीवर आणली आहेत. त्यामुळे पुन्हा जुनी नाटके नव्या ढंगात करायची की काही वेगळे करायचे, याचा सध्या विचार सुरू आहे. एखादे संगीत नाटक करू या, असादेखील आमचा विचार सुरू होता; पण त्याच वेळी काही संगीत नाटके आणि चित्रपट आले. यामुळे संगीत नाटके न करण्याचे आम्ही ठरवले. सध्या तरी आमच्या चर्चा सुरू आहेत; पण हर्बेरियम लवकरच रसिकांच्या भेटीला आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
नटसम्राट या चित्रपटानंतर आता तू कोणत्या चित्रपटात झळकणार आहेस?
- पुढील काळात माझे तीन-चार चित्रपट येणार असून, त्या सगळ्यांमधील माझ्या भूमिका खूपच वेगळ्या आहेत.
-prajakta.chitnis@lokmat.com