बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद यांच्या आयुष्यावरही येणार सिनेमा

By Admin | Updated: June 29, 2017 13:14 IST2017-06-29T13:02:24+5:302017-06-29T13:14:43+5:30

देशातील सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या आयुष्यावरही आधारित सिनेमा बनवण्यात येणार आहे.

Badminton player p. Cinemas will also come on Gopichand's life | बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद यांच्या आयुष्यावरही येणार सिनेमा

बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद यांच्या आयुष्यावरही येणार सिनेमा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - बॉलिवूडमधील सिनेनिर्मात्यांमध्ये सध्या बायोपिकची निर्मिती करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा साकारण्यात येणार असल्याची चर्चा होती. या सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार असल्याचीही माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे आता सायना नेहवालचे पूर्वीचे प्रशिक्षक आणि देशातील सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या आयुष्यावरही आधारित सिनेमा बनवण्यात येणार आहे. 
 
बॅडमिंटन खेळात भारताचे वेगळे स्थान निर्माण करणारे अर्जुन पुरस्कार विजेते पी. गोपीचंद यांच्या जीवनकहाणीवर सिनेमा बनवण्याचा निर्धार केला आहे दिग्दर्शक विक्रम मल्होत्रा यांनी. विक्रम मल्होत्रा यांनी ""एअरलिफ्ट"" आणि ""बेबी""सारखे हिट सिनेमे इंडस्ट्रीला दिलेले आहेत. त्यांनी पुलेला यांचा बायोपिक बनवण्यासंदर्भातील राईट्सदेखील मिळवले आहेत.  गोपीचंद यांची मातृभाषा तेलुगू आहे. यासाठी त्यांच्या जीवनावर साकारण्यात येणारा सिनेमा हिंदीसहीत तेलुगू भाषेतही रिलीज करण्यात येणार आहे. 
 
खुद्द गोपीचंद यांनी सिनेमाच्या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, माझ्या आयुष्यावर येणा-या सिनेमासंबंधी मी आतापासूनच खूप उत्सुक आहे. या माध्यमातून बॅडमिंटन खेळाला जगभरात एका वेगळ्या स्तरावर नेण्यास मदत मिळेल, अशी माझी या सिनेमाकडून अपेक्षा आहे. दीपिका पादुकोणचे वडील आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांच्यानंतर गोपीचंद दुसरे असे भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहेत की ज्यांनी 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला. 
 
हैदराबादमधील गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीनं सायना नेहवाल, पी.व्ही सिंधू आणि श्रीकांत किदांबी यासारखे खेळाडू देशाला दिले आहेत, जे जगभरात देशाचे नाव गाजवत आहेत.
 
विक्रम मल्होत्रा यांनी सिनेमासंदर्भात सांगितले की, गोपीचंद यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्यावर सिनेमा बनवणं आणि त्यांची कहाणी संपूर्ण जगासमोर आणण्याची संधी मिळणं, माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. शिवाय, ही एक मोठी जबाबदारीदेखील आहे. कारण गोपीचंद यांचे यशच प्रेरणादायी नसून त्यांनी समाज, देश आणि खेळासाठी दिलेले योगदानही प्रचंड मोठे आहे. त्यांचे आयुष्य प्रभावीपणे  मोठ्या पडद्यावर मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. दरम्यान, गोपीचंद यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याबाबत अद्यापपर्यंत काहीही ठरलेले नाही. 
 
अभिनेत्याची निवड करणं कठीण असणार आहे. कारण आम्हाला अशा एका अभिनेत्याची गरज आहे, ज्यामध्ये खेळातील कौशल्य आणि अभिनयाव्यतिरिक्त स्वतःला गोपीचंद यांच्याशी एकरुप होण्याची क्षमता असेल. कदाचित यासाठी आम्ही एखाद्या नवख्या अभिनेत्याला संधी देऊ शकतो, असे विक्रम म्हणाले आहेत.
 

Web Title: Badminton player p. Cinemas will also come on Gopichand's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.