"भारतमाता थिएटरचा गेट प्रेक्षकांनी तोडला कारण.."; सिद्धार्थ जाधवने सांगितला किस्सा, काय घडलं होतं?
By देवेंद्र जाधव | Updated: April 7, 2025 11:27 IST2025-04-07T11:27:19+5:302025-04-07T11:27:50+5:30
सिद्धार्थ जाधवने एका मुलाखतीत मराठी सिनेमांचा एक खास सर्वांसोबत शेअर केला (siddharth jadhav)

"भारतमाता थिएटरचा गेट प्रेक्षकांनी तोडला कारण.."; सिद्धार्थ जाधवने सांगितला किस्सा, काय घडलं होतं?
ज्याने मराठी सिनेसृष्टीत प्रेम मिळवलंच पण ज्याने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली असा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव.सिद्धार्थ जाधवने (siddharth jadhav) एका सिनेमाच्या माध्यमातून साऊथमध्येही काम करतोय. सिद्धार्थ प्रत्येक मुलाखतीत मराठी सिनेमे आणि मराठी भाषेचे गोडवे गाताना दिसतो. सिद्धार्थ नुकताच अभिनेत्री भारती सिंग (bharti singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सिद्धार्थने मराठी सिनेमांच्या सुपरहिट काळ पुन्हा जागवला. काय म्हणाला सिद्धार्थ?
सिद्धार्थ जाधवने जागवला मराठी सिनेमांचा सुपरहिट काळ
सिद्धार्थ जाधवने पॉडकास्टमध्ये सांगितलं की, "माझं करिअर २००० सालापासून सुरु झालं. परंतु २००३ मध्ये मी मराठी सिनेमात पदार्पण केलं. अगं बाई अरेच्चा हा माझा पहिला सिनेमा. मी जेव्हा मराठी सिनेसृष्टीत आलो होतो तेव्हा श्वास हा मराठी सिनेमा ऑस्करसाठी निवडला गेला होता. मी मराठी सिनेमाचा तो काळ बघितला आहे. अनेक मोठ्या कलाकारांनी तो काळ बघितला आहे. त्या काळात भारतमाता नावाचं थिएटर आहे जे आम्हा सर्व कलाकारांच्या हृदयाच्या जवळ असलेलं थिएटर आहे. जत्रा सिनेमाच्या वेळेस त्या थिएटरचा पूर्ण गेट तुटला होता इतकी गर्दी होती."
"तुम्हाला कल्पना करु शकत नाही की, दे धक्का हा माझा मराठी सिनेमा आहे. त्याची तिकिटं ब्लॅकमध्ये विकली गेली होती. प्रेमाचा झोलझाल सिनेमाच्या वेळेस मी प्लाझा थिएटरच्या वर हाऊसफुल्लचा बोर्ड घेऊन चढलो होतो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा हिंदीचा सिनेमा काढून मराठी शो वाढवले होते." अशाप्रकारे सिद्धार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या. सिद्धार्थ जाधव या वर्षात नवनवीन विषय असणाऱ्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.