आभासी वास्तवाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 28, 2015 05:18 IST2015-08-28T05:18:00+5:302015-08-28T05:18:00+5:30
‘आजच्या वास्तवाचे भीतीदायक आकलन माझ्या मनात आहे. त्यामुळे आभासी वास्तवाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न ‘हायवे : एक सेल्फी आरपार’ या सिनेमातून करण्यात आला आहे.

आभासी वास्तवाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न
‘आजच्या वास्तवाचे भीतीदायक आकलन माझ्या मनात आहे. त्यामुळे आभासी वास्तवाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न ‘हायवे : एक सेल्फी आरपार’ या सिनेमातून करण्यात आला आहे. हा सिनेमा म्हणजे आजच्या काळाचे प्रतिबिंब आहे..’ लेखक आणि अभिनेता गिरीश कुलकर्णींनी सांगितले.
येत्या २८ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘हायवे - एक सेल्फी आरपार’ सिनेमातील कलाकारांनी बुधवारी लोकमत मुंबई कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान, इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात केलेला मुंबई -पुणे प्रवास ते मराठी सिनेसृष्टीच्या स्थितीचा आढावा कलाकारांनी घेतला. ‘वळू’, विहिर’ आणि ‘देऊळ’नंतर नेहमीची चाकोरीबद्धता मोडून वेगळं करण्याचा मानस होता. या सिनेमाच्या माध्यमातून रोजच्या जगण्यात हरवलेले ‘स्वत्त्व’ शोधण्याची वाट नेमकी कशी सापडेल? याचे उत्तर प्रेक्षकांना सिनेमातून मिळेल असेही गिरीश म्हणाला.
मुंबई-पुणे प्रवास, ३५ व्यक्तिरेखा, त्यांची वैशिष्ट्य, आत्ताचा काळ आणि माणूसपणं अशा सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असल्याचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण रस्ते - हमरस्ते यावर करण्याचे ठरले होते. त्यासाठीच मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर चित्रीकरण करण्याचे पक्के झाले. प्रवास करणाऱ्या व्यक्तिरेखांबरोबर कोणत्याही तंत्रज्ञाला त्या वाहनांतून प्रवास करणे शक्य नव्हते. अशा प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करूनच सगळी आखणी केली गेली, असे उमेशने सांगितले.
माझी व्यक्तिरेखा या सिनेमाचा खराखुरा ‘हीरो’ असल्याचे अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितले. उमेश-गिरीश कुलकर्णी या जोडगोळीपासून प्रेरणा घेत लवकरच स्वत:ची स्वतंत्र कलाकृती घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचेही तिने सांगितले. तर वेगवेगळ््या भूमिकांच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणून स्वत:ला पारखत असते. त्याच प्रयत्नातून या सिनेमातील ग्रामीण लहेजा असलेल्या भाषेत बोलणारी भूमिका केली आहे, असे मुक्ता बर्वे म्हणाली.
दिग्गजांनी केले कौतुक!
‘हायवे’चा शो हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आणि समीक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी, दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी कलाकारांच्या अभिनयाचे आर्वजून कौतुक केल्याचे गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.तर नसीरूद्दीन शहा यांनाही हा चित्रपट आवडला.
तरुण निर्मात्यांची गरज
मराठी चित्रपटसृष्टीत जसे नव्या पिढीचे कलाकार, दिग्दर्शक येत आहेत. त्याचप्रमाणे, मराठी चित्रपट पोहोचविणारी मंडळी असायला पाहिजेत असे मत गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या इंडस्ट्रीत वितरकांची अधिकाधिक आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या काही निर्माते केवळ हौसेसाठी निर्मिती क्षेत्रात येतात आणि एखाद दुसरा चित्रपट करुन गायब होतात. हे चित्र बदलले पाहिजे, त्यासाठी मोठ्या संख्येने निर्माते घडले पाहिजेत.
मराठी चित्रपटसृष्टी
अजूनही संक्रमणावस्थेत
मराठी चित्रपटांना अजूनही सिनेमागृहे मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. शिवाय, अर्थकारणाची मोठी समस्या इंडस्ट्रीला भेडसावते आहे. मराठी चित्रपटसृष्टीला न्याय मिळेल अशी परिपूर्ण संस्थाच नसल्याचे परखड मत गिरीश कुलकर्णी यांनी मांडले. मात्र नवे विषय आणि चित्रपटाचे स्वरुप बदलल्याने आशादायक चित्र आहे. परंतु, मराठी चित्रपटसृष्टीत अनेक समस्या आणि प्रश्न आहेत अजूनही ही या सृष्टीचा संक्रमण काळ सुरु आहे.
हिंदीत नव्हे, फक्त मराठीतच प्रयोग
बॉलीवूड अभिनेत्री तिस्का चोप्रा आणि हुमा कुरेशी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान असल्याचे सांगत त्यांनी केलेला अभिनयही वाखाण्याजोगा आहे, असे मत उमेश कुलकर्णी यांनी मांडले. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रयोग होत नसून त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांना काम करावे लागते असेही ते म्हणाले.