कलेचा परि'पाक'..

By Admin | Published: October 9, 2016 01:48 PM2016-10-09T13:48:05+5:302016-10-09T13:48:05+5:30

ज्या वयात माणुसकी म्हणजे काय हे कळत नव्हतं त्या वयात हे गाणं ऐकलं होतं; आणि ज्या वयात माणुसकीचा अर्थ कळायला लागला तेव्हा नेमका या गाण्याचा विसर पडला होता

Artwork 'Pacha Pakak' .. | कलेचा परि'पाक'..

कलेचा परि'पाक'..

googlenewsNext

- प्रसाद ओक
जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू..
ज्या वयात माणुसकी म्हणजे काय हे कळत नव्हतं त्या वयात हे गाणं ऐकलं होतं; आणि ज्या वयात माणुसकीचा अर्थ कळायला लागला तेव्हा नेमका या गाण्याचा विसर पडला होता. ज्या वयात शत्रू किंवा युद्ध या शब्दांबद्दल कुतूहल होतं त्या वयात त्या शब्दांचा नेमका अर्थ कळत नव्हता..
पण ज्या वयात अर्थ कळायला लागला त्या वयात त्या कुतूहलाची जागा रागानी घेतली होती.
का कोणास ठाऊक पण लहानपणापासून जेव्हा जेव्हा शत्रू शब्द ऐकला तेव्हा तेव्हा फक्त 'पाकिस्तान' एवढंच ऐकलं होतं; आणि कळत-नकळत या देशाबद्दल मनात खूप राग निर्माण होत होता. पुढे पुढे तर हा राग अजूनच पक्का होत गेला आणि त्याला कारणही तोच देश होता.

म्हणून जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मॅचमध्ये पाकिस्तान आपला प्रतिस्पर्धी असायचा तेव्हा तेव्हा मॅच पाहताना रक्त असं खवळलेलं असायचं आणि मॅच जिंकल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असायचा. शत्रूची जिरवल्याचा असावा बहुधा तो आनंद. नंतर कोणा एका राजकीय पक्षामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आपल्या देशात खेळण्यास मज्जाव करण्यात आला. कारण मधल्या काही वर्षांमध्ये बर्‍याच वेळा भारताला दहशतवादाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्याची पाळंमुळं ९९ % पाकिस्तानातच रुजली होती. तेव्हा जो देश दहशतवादाला पाठिंबा देतो आणि आपल्या देशाचं नुकसान घडवून आणतो त्या देशातले खेळाडू आपल्या मातीत खेळणार नाहीत अशी काहीशी राजकीय भूमिका घेतली गेली.

आनंदाने म्हणा वा जबरदस्तीने म्हणा त्या भूमिकेला बर्‍याच मोठय़ा प्रमाणात पाठिंबाही मिळाला. पण त्यानंतरही पाकच्या अंगातली खुमखुमी काही संपली नाही. त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं. मग बर्‍याच घडामोडी झाल्या. निवडणुका आल्या. सरकार बदललं. नव्या सरकारचा गाजावाजा झाला. वचनं दिली गेली. काही पाळली गेली, काही पळून गेली. या सगळ्यात पाकचं सगळंकाही चालूच होतं.आपल्या देशाने, राज्यकर्त्यांनी बराच संयम दाखवला. मग संयम सुटला आणि एक सजिर्कल स्ट्राइक करण्यात आलं. हे सगळं आपणास ज्ञात आहेच. असो.
तर त्यानंतर अजून एका राजकीय पक्षाने आता पाकिस्तानी कलाकारांबद्दल सेम भूमिका घेतली. जशी, पूर्वी खेळाडूंबद्दल घेतली गेली होती. या भूमिकेलाही मोठा पाठिंबा मिळाला. अगदी इम्पा या मान्यवर आणि अधिकृत संस्थेनेसुद्धा याला अनुमोदनच दिलं. तर मुद्दा असा की कलेला सीमा नसते, प्रांत नसतो वगैरे बरंचकाही आपण ऐकत असतो. पण जेव्हा एक देश एका 'प्रांता'साठी आखलेल्या सगळ्या 'सीमा' उल्लंघून अतिरेकी आणि दहशतवादी कारवाया करतो तेव्हा कलेबिलेपेक्षा देश सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा असतो. देश शाबूत राहिला तर माणूस आणि कला दोन्ही शाबूत राहू शकतं. आणि देशाचं नुकसान हे कधीही मोठंच नुकसान असतं.

या न्यायाने त्या देशातल्या खेळाडू, कलाकार किंवा कोणालाही सन्मानाने आपल्या देशात आणणं घातक ठरू शकतं; आणि कलाकार आपल्या देशात काय कमी आहेत.? त्यांना प्राधान्य द्यायलाच हवं. या सगळ्यात पाकिस्तानी कलाकाराचा अपमान करणं वगैरे हेतू असूच शकत नाही. कधीतरी त्यांच्याकडच्या कोणत्यातरी चित्रपटात भारतीय कलाकार घेतल्याचं ऐकलंय किंवा वाचलंय कोणी.? मग आपणच असं का वागायचं.?

मेहेंदी हसन साहेब, गुलाम अली साहेब, नूर जहां यांची गाणी ऐकतच वाढलो की आपण. अगदी नुसरत फतेह अली खानपर्यंत त्यांच्या कलाकारांचा आदरच केला आपण. पण फवादसारखे काही नराधम आपल्या देशात येऊन कमावून जातात.. आणि तिकडे जाऊन पुन्हा आपलेच वाभाडे काढतात. यापेक्षा जर भारतीय कलाकारांना प्रोत्साहन आणि प्राधान्य दिलं तर त्यांची आणि पर्यायाने देशाचीही छाती ५६ इंचांपेक्षाही रुंद होऊ शकते.

कला काय किंवा क्रीडा काय.. ती सादर करतो किंवा खेळतो माणूस. एन्जॉय करतो माणूस. जीव ओततो माणूस. प्रेम करतो माणूस. मग ते प्रेम कलेवर असतं, खेळावर असतं आणि देशावर तर असतंच असतं. कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा आणि देश जपतो, जोपासतो तो माणूस.. आणि माणूस म्हटलं की त्याच्या ठायी आपसूक येते ती 'माणुसकी'.. म्हणूनच जो देश माणुसकी विसरून माणुसकीच्याच विरोधात सतत वागत असेल तो ठरतो माणुसकीचा शत्रू..

आणि म्हणूनच
माणुसकीच्या शत्रूसंगे
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू..
जय हिंद!
जय भारत!!
(लेखक प्रसिद्ध अभिनेते वदिग्दर्शक आहेत.)

Web Title: Artwork 'Pacha Pakak' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.