अर्जून कपूरची जीम महापालिका तोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 13:54 IST2016-12-29T13:51:16+5:302016-12-29T13:54:29+5:30
अभिनेता अर्जून कपूरला महापालिकेने नोटीस पाठवली असून जुहूमधील आपल्या घराच्या छतावर तयार करण्यात येणारी जीम तोडण्यास सांगितलं आहे

अर्जून कपूरची जीम महापालिका तोडणार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - अवैध बांधकाम प्रकरणी कपिल शर्मानंतर अजून एक सेलिब्रेटी महापालिकेच्या रडारवर आहे. अभिनेता अर्जून कपूरला महापालिकेने नोटीस पाठवली असून जुहूमधील आपल्या घराच्या छतावर तयार करण्यात येणारी जीम तोडण्यास सांगितलं आहे. 'अर्जून कपूरने आपल्या घराच्या छतावर पर्सनल जीमसाठी 30/16 स्क्वेअर फिटमध्ये बांधकाम केलं आहे, यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती,' असं महापालिकेने सांगितलं आहे. यासंबंधी अर्जून कपूरकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.
अर्जून कपूर जुहूमधील रहेजा ऑर्किड इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहतो. अर्जून कपूरविरोधात ही तक्रार त्याच्या इमारतीमधील कोणत्याही रहिवाशाने केली नसून एका सामाजिक कार्यकर्त्याने ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणली. यानंतर महापालिकेने कारवाई सुरु केली होती. मार्चमध्ये सर्वात पहिली नोटीस पाठवण्यात आली होती, त्यानंतर गेल्याच आठवड्यात दुसरी नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसमध्ये अवैध बांधकाम तोडण्यासाठी महापालिका कर्मचा-यांना इमारतीत प्रवेश देण्यासंबंधी सांगण्यात आलं होतं.
काही दिवसांपूर्वी अर्जून कपूरच्या मॅनेजरने वॉर्ड ऑफिसर, सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांची भेट घेत काही दिवसांची वेळ मागितली होती. मात्र यानंतर अर्जून कपूरकडून कोणतीही हालचाल न झाल्याने महापालिकेकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
'हे बांधकाम वैध आहे सिद्द करण्याठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. मात्र कोणताच पुरावा सादर केला गेला नाही. अखेर आम्ही नोटीस पाठवून कर्मचा-यांना बांधकाम पाडण्यासाठी इमारतीत प्रवेश देण्याची मागणी केल्याचं,' पराग मसुरकर यांनी सांगितलं आहे.