अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:22 IST2025-08-21T09:22:26+5:302025-08-21T09:22:47+5:30
अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी यांना २८ ऑगस्ट रोजी ‘हाजिर हो’चे आदेश दिले आहेत

अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: एका हिंदी चित्रपटात कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली कलाकार व निर्माते यांनी थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याप्रकरणी चित्रपट प्रदर्शनावर मनाई हुकूम मिळण्यासाठी पुण्यातील दोन वकिलांनी दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने निर्मात्यासह अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी यांना २८ ऑगस्ट रोजी ‘हाजिर हो’चे आदेश दिले आहेत.
संबंधित चित्रपटाचे कथानक हे वकील आणि न्यायालय याभोवती फिरते. चित्रपटात थेट वकील तसेच न्यायाधीशांबाबत असभ्य भाषेमध्ये विनोद करण्यात आले आहेत. या चित्रपटातील कलाकार अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बँड (बो) घालून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता ॲड. वाजेद खान (बिडकर) व ॲड. गणेश म्हस्के यांनी न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. वकील व न्यायाधीशांवर केलेल्या असभ्य भाषेतील विनोदावर त्यांचा आक्षेप आहे.