भावनाशून्य समाजाचे व्यंग मांडणार 'करार'

By Admin | Updated: January 11, 2017 05:41 IST2017-01-11T05:41:22+5:302017-01-11T05:41:22+5:30

आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी समाजाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे.

The 'Agreement' | भावनाशून्य समाजाचे व्यंग मांडणार 'करार'

भावनाशून्य समाजाचे व्यंग मांडणार 'करार'

आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी समाजाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी माणसांनी कामाला अक्षरश: वाहून घेतले आहे, त्यासाठी त्याने आपल्या भावनिक मूल्यांनादेखील केव्हाच मागे सोडले आहे. प्रेम आणि नातेसबंधांमध्येही माणूस त्याचा हा 'वर्कहोलिक' दृष्टीकोन वापरताना दिसून येतो. अशा या भावनाशून्य समाजाचे व्यंग 'करार' या आगामी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित 'करार' या सिनेमाचे क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेत दिसून येणार आहे.
या सिनेमात सुबोधसोबत उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेत आढळणार आहेत. तसेच सुहासिनी मुळे आणि आरती मोरे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वत:च्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा यात मांडली आहे. आयुष्याला केवळ 'करार' म्हणून पाहणाऱ्या या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणिवा आणि त्यातून भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसून येतात. तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार या सिनेमाचा महत्वाचा सार आहे. 'करार' या सिनेमाचा ट्रेलर भावनाशून्य झालेल्या समाजाचे कान पिळणारा ठरत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांना रोमांचित करणारी आहेत. या गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीत दिग्दर्शक विजय गावंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे. संजय जगताप लिखित हा सिनेमा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरेल यात शंका नाही. आजच्या धावत्या जगात बदल चाललेली मातृत्वाबाद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा १३ जानेवारी रोजी संपूर्ण चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Web Title: The 'Agreement'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.