"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:06 IST2025-05-16T17:05:44+5:302025-05-16T17:06:32+5:30
बॉलिवूड अभिनेत्रीचे वडील पाकिस्तानी अभिनेते होते आणि त्यांनी ७०च्या दशकात अनेक चित्रपट दिले होते. पण तिने कधीही त्यांचे आडनाव वापरले नाही आणि ती त्यांना भेटली नाही.

"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री तब्बू(Tabu)ने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ७ फिल्मफेअर आणि २ राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी तब्बू ही एका पाकिस्तानी अभिनेत्याची मुलगी आहे. इतकेच नाही तर तब्बू नेहमीच तिचे वडील जमाल हाश्मी यांचा द्वेष करायची, जे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील स्टार होते आणि त्यांचे तोंडही तिला पहायला आवडत नव्हते. इतकेच नाही तर तिला कधीच त्यांना भेटावेसे वाटले नाही. तिचे बालपण तिची आई आणि आजीच्या देखरेखीखाली गेले. वयाच्या ५४ व्या वर्षीही तब्बू अविवाहित आहे आणि एकटी राहते.
४ नोव्हेंबर १९७० रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या तब्बूचे वडील ७० च्या दशकातील पाकिस्तानी चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते होते. पाकिस्तानात अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, तब्बूचे वडील जमाल हाश्मी यांनी तब्बूच्या आईशी लग्न केले आणि भारतात आले. पण लग्नाच्या काही वर्षांनी तब्बूची बहीण फराह नाझचा जन्म झाला आणि त्यानंतर तब्बूचा जन्म झाला. पण तब्बू ३ वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तब्बूच्या आईला घटस्फोट दिला आणि पुन्हा लग्न केले. त्यानंतर तब्बूने तिच्या वडिलांना कधीही पाहिले नाही. इतकेच नाही तर तब्बूने तिच्या वडिलांचे आडनावही स्वीकारले नाही.
''कधीच त्यांचं आडनाव लावलं नाही..''
२०१५ मध्ये सिमी गिरवालला दिलेल्या मुलाखतीत तब्बू म्हणाली, ''मी कधीही माझ्या वडिलांचे आडनाव स्वीकारले नाही. मला ते कधीही आवश्यक वाटले नाही. मी त्यांना कधीही पाहिले नाही आणि मला कधीही भेटण्याची इच्छाही नव्हती. इतकेच नाही तर मला त्यांना जाणून घेण्याची उत्सुकताही नव्हती. माझ्या बहिणीने त्यांना पाहिले होते पण मी तसे केले नाही. मी माझ्या आई आणि आजीच्या सावलीत लहानाची मोठी झाले आणि कधीही आडनाव स्वीकारले नाही.''
बॉलिवूडची बनली टॉप हिरोईन
तब्बूची आई शाळेत शिक्षिका होती आणि बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीची चुलत बहीण देखील होती. तब्बूची मोठी बहीण फराह नाजने सिनेइंडस्ट्रीला आपले करिअर म्हणून निवडले आणि अभिनेत्री बनली. तब्बू देखील तिच्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आली आणि येथे तिचे नशीब आजमावू लागली. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला 'पहला पहला प्यार' हा चित्रपट तब्बूचा पहिला चित्रपट होता आणि ऋषी कपूर मुख्य नायक होते. तब्बूचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट ठरली. त्यानंतर तब्बूने तिचा जवळचा मित्र अजय देवगणसोबत १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विजयपथ' चित्रपटात काम केले आणि दोघांची जोडी सुपरहिट झाली. तब्बू आणि अजय दोघेही स्टार झाले. मग काय, तब्बूने मागे वळून पाहिले नाही. ९० च्या दशकात तब्बूने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि एक टॉपची हिरोईन बनली. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही भूमिकांना न्याय देणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींच्या यादीत तब्बूचाही समावेश आहे.
वयाच्या ५४ व्या वर्षीही अभिनेत्री आहे सिंगल
तब्बूने तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने अविवाहित राहणे पसंत केले. तब्बूच्या अफेअर्सच्या अनेक बातम्या येत होत्या आणि नागार्जुनसह अनेक चित्रपट कलाकारांसोबतच्या तिच्या संबंधांच्या बातम्याही चर्चेत येत होत्या. पण तब्बूने कधीही लग्न केले नाही. आता तब्बू वयाच्या ५४ व्या वर्षीही सिंगल जीवन जगते आहे. अलिकडेच, तब्बूने 'ड्यून प्रोफेसी' या हॉलिवूड सीरिजमध्ये उत्तम काम केले आणि जगभरातून तिला कौतुकाची थाप मिळते आहे.