अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:33 IST2025-08-05T20:32:19+5:302025-08-05T20:33:51+5:30
अभिनेत्री काजोल गेल्या ३३ वर्षांपासून हिंदी मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. अभिनेत्री काजोलला (Kajol) राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री काजोल गेल्या ३३ वर्षांपासून हिंदी मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. आपल्या करिअरमध्ये तिने आजपर्यंत २०० हून अधिक सिनेमे केले. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार मिळाला. या सोहळ्याला तिच्यासोबत आई तनुजा या देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आज काजोल ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिला या प्रतिष्ठित पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि सहा लाख रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्यानंतर भावना मांडताना काजोल म्हणाली, "आज माझा वाढदिवस आहे. इतक्या मान्यवरांसमोर मी मंचावर उभी आहे. आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. कारण आज माझी आई माझ्यासमोर बसली आहे. मी तिचीच साडी नेसली आहे. हा पुरस्कारही माझ्याआधी तिलाही मिळालेला होता. वाढदिवसाच्या दिवशी याहून मोठा पुरस्कार कोणताही नव्हता. मी आयुष्यात नक्कीच काहीतरी केलंय हे आज मी सांगू शकते."
बेखुदी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, गुप्त, कभी खुशी कभी गम, अशा कित्येक सिनेमांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिच्या अभिनयाची आजही प्रेक्षकांवर जादू आहे. १९९२ साली आलेल्या 'बेखुदी'मधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. काजोलला मनोरंजनविश्वात ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही ती त्याच जोशात, तिच्या स्टाईलमध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांचं मनोरजन करत आहे. २०११ साली काजोलला पद्मश्री पुरस्कारही मिळाला.