मराठमोळ्या अभिनेत्रीने नाकारलेली आमिर खानच्या 'दंगल'ची ऑफर; म्हणाली, "कुस्तीचं प्रशिक्षण..."
By ऋचा वझे | Updated: March 16, 2025 14:41 IST2025-03-16T14:19:48+5:302025-03-16T14:41:30+5:30
सिनेमासाठी घेतलेली कुस्तीची ट्रेनिंग वेबसीरिजमध्ये कामी आली

मराठमोळ्या अभिनेत्रीने नाकारलेली आमिर खानच्या 'दंगल'ची ऑफर; म्हणाली, "कुस्तीचं प्रशिक्षण..."
२०१६ साली आलेला आमिर खानचा 'दंगल' सिनेमा खूप गाजला. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड केला होता. गीता फोगाट आणि बबिता फोगाट या कुस्तीपटूंवर सिनेमा आधारित होता. 'हमारी छोरियाँ छोरो से कम हे के' हा डायलॉग तर खूप गाजला होता. आमिर खानने महावीर फोगाट यांची भूमिका साकारली होती. अशा या ब्लॉकबस्टर सिनेमाला चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नकार दिला होता. कोण आहे ती अभिनेत्री?
'आश्रम' या गाजलेल्या वेबसीरिजमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अदिती पोहनकर (Aditi Pohankar). तिने साकारलेली पम्मी पहलवान भूमिका प्रचंड गाजली. अदितीचं खूप कौतुक झालं. याशिवाय अदिती 'SHE' या वेबसीरिजमुळेही चर्चेत आली. अदितीला आता हिंदी सिनेसृष्ट्रीत वेगळी ओळख मिळाली आहे. पण तुम्हाला माहितीये का तिला आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाचीही ऑफर मिळाली होती?
अदिती पोहनकरचा खुलासा
ईटाईम्सशी बोलताना अभिनेत्री अदिती पोहनकर म्हणाली, "मला आमिर खानच्या दंगल मध्ये काम करण्याची ऑफर होती. त्यासाठी मी कुस्तीचं प्रशिक्षणही घेतलं होतं. पण मी सिनेमाला नकार दिला. तरी तेव्हा जे प्रशिक्षण घेतलं तेच मला नंतर आश्रममधल्या पम्मीच्या भूमिकेसाठी काम आलं. तेव्हा मी कुस्तीच्या ट्रेनिंगसोबतच हरियाणवी लहेजाही शिकले होते. त्याचा मला आश्रम वेळी उपयोग झाला. त्या अनुभवामुळेच मला एक विशिष्ट दृष्टिकोन मिळाला. एका अॅथलीटच्या रुपात स्वत:बद्दल, तसंच एक अभिनेत्री म्हणून दमदार भूमिका करण्याची ताकद मला मिळाली. तुम्ही जेव्हा काही शिकता ते कधी ना कधी उपयोगात येतंच. तेच माझ्यासोबत झालं."
प्रकाश झा यांचे मानले आभार
'आश्रम'चे दिग्दर्शक प्रकाश झा यांचे आभार मानत अदिती म्हणाली, "मला या सीरिजने बरंच काही शिकवलं. कुस्ती शिकले, ट्रेनिंग घेतली आणि भावनिकरित्या अनेक सीन्स केले जे आव्हानात्मक होते. पण तितकेच समाधानकारक होते."
अदिती पोहनकरने रितेश देशमुखच्या 'लय भारी' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारली. याशिवाय 'लव्ह सेक्स और धोका' मध्येही ती दिसली. अदितीला 'आश्रम' आणि 'she' या वेबसीरिजमुळे कमालीची लोकप्रियता मिळाली आहे.