कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.."
By अबोली कुलकर्णी | Updated: July 15, 2025 16:16 IST2025-07-15T16:15:14+5:302025-07-15T16:16:08+5:30
दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील गुरु कोण, याचा खुलासा केलाय. अत्यंत सुंदर शब्दात दिग्पाल यांनी गुरुंचं वर्णन केलंय

कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.."
संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, ‘गुरूवीण कोण दाखवील वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट...’ त्यांच्या या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे अढळ स्थान असते. आयुष्याच्या वेगवेगळया टप्प्यावर आपल्याला गुरू भेटतात. त्यांनी दाखवलेला मार्ग जर आपण अवलंबला तर नक्कीच यश मिळते.
माझ्या आयुष्याला दिशा देणारे चार गुरू आहेत. त्यात प्रा.श्यामराव जोशी, शाहिर दादा पासलकर, सुहास भोळे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांचा समावेश आहे. यांच्याशिवाय विनय आपटे, स्मिता तळवळकर, संजय सुरकर यांच्याकडूनही मी दिग्दर्शन आणि निर्मितीबाबत काही गोष्टी शिकलो. या सर्व गुरूंनी माझं आयुष्य समृद्ध केलं. प्रा.श्यामराव जोशी हे पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.
गत ५० ते ६० वर्षांपासून ते ‘वाणी संस्कार व आवाजशास्त्र’ या विषयामध्ये संशोधन करतात. अनेक कलाकार विद्यार्थ्यांना त्यांनी तयार केले आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी मी एक. मुळचा रत्नागिरीचा पण मी पुण्यात शिकून मोठा झालो. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेलो असल्याने जगण्याची, अभ्यासाची जिद्द होती. त्यामुळे आई-वडिलांचे संस्कार आणि गुरूंचे मार्गदर्शन यामुळे मी नाट्यक्षेत्रात अनेक गोष्टी शिकत गेलो.
२००४ मध्ये ‘संस्कार भारती’च्या ‘क्रांतीसूर्य सावरकर’ या नाटकादरम्यान माझी प्रा. श्यामराव जोशी यांची भेट झाली. मला वाटत होतं की, त्यांनी मला शिकवावं. पण, माझा रंगभूमीशी असलेला प्रामाणिकपणा पडताळून मला शिकवायचं की नाही हे ते ठरवणार होते. मग, २००६ या वर्षी मी ‘संस्कार भारती’साठी एक महानाट्य लिहिले आणि ते केले. तेव्हा श्यामराव जोशी आणि राजदत्तजी हे दोघेही रोज तालमीच्या वेळी उपस्थित असायचे.
याच दरम्यान माझ्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. असे असूनही त्यादिवशी मी संध्याकाळी नाटकाची तालीम घेतली. तेव्हा श्यामराव जोशींनी मला बोलावले आणि ते म्हणाले, तू माझ्याकडे ये मी तुला शिकवतो. आज मी जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच. गेली १८ वर्षे मी त्यांच्याकडे अभिनय व नाट्यविचार शिकतो आहे. आजही मला काही मार्गदर्शन हवे असेल किंवा काही सांगायचे असेल तर मी त्यांच्याकडेच जातो.
मला श्यामराव नेहमी सांगतात, कला ही आतून बाहेर प्रकट होते. शास्त्र बाहेरून आत येते. त्यामुळे निसर्गतः जे घडते ते घडू द्यावे. ते गंमतीने म्हणतात, ‘दिमाग मत चलाओ..’ आणि खरंच आजही तसे होते, मी एखाद्या प्रोजेक्टवेळी अडकलो तर जास्त विचार न करता ती गोष्ट केल्यास ती सहज होऊन जाते. तसेच ते सांगतात, एखाद्या गोष्टीकडे तिरकं (शब्दांच्या पलीकडे) बघायला शिका. तुम्हाला वेगळा आशय मिळू शकेल. या शिकवणीमुळे माझ्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक कारकिर्दीला सुद्धा अर्थ मिळाला आहे.