सनी देओलचे तोंड काळे करणा-यास १० लाखांचे बक्षीस - भाजपा नेते बरळले
By Admin | Updated: June 30, 2015 11:52 IST2015-06-30T11:52:16+5:302015-06-30T11:52:45+5:30
अभिनेता सनी देओलचे तोंड काळे करणा-यास १० लाख रुपयांचे बक्षीस देऊ असे वादग्रस्त विधान मेरठमधील भाजपाच्या व्यापारी शाखेचे नेते विनीत अग्रवाल यांनी केले आहे.
सनी देओलचे तोंड काळे करणा-यास १० लाखांचे बक्षीस - भाजपा नेते बरळले
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ३० - अभिनेता सनी देओलचे तोंड काळे करणा-यास १० लाख रुपयांचे बक्षीस देऊ असे वादग्रस्त विधान मेरठमधील भाजपाच्या व्यापारी शाखेचे नेते विनीत अग्रवाल यांनी केले आहे. तर दुसरीकडे मोहल्ला अस्सी या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सनी देओल व अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेता सनी देओल, साक्षी तन्वर यांची प्रमुख भूमिका असलेला मोहल्ला अस्सी या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. शिवराळ भाषा व हॉट सीन्समुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची हवा निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शंकराच्या वेशभूषेतील एक कलाकार शिवराळ भाषा प्रयोग करताना दिसतो. या चित्रपटावर हिंदूत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. मेरठमधील भाजपाच्या व्यापारी शाखेचे नेते विनीत अग्रवाल यांनी असभ्य भाषेत सनी देओलवर टीका केली. मोहल्ला अस्सी या चित्रपटात काम करणारा अभिनेता सनी देओल, निर्माता व दिग्दर्शक यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढणा-यास १० लाखांचे बक्षीस देऊ अशी वादग्रस्त घोषणाच त्यांनी केली आहे. या चित्रपटात भगवान शंकराचा अपमान झाला असून चित्रपटातील शिवराळ भाषा आम्ही कधीच खपवून घेणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
लखनौमधील बर्नाला पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने सनी देओल व चित्रपटातील अन्य पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर अलाहाबादमधील हायकोर्टानेही मोहल्ला अस्सीच्या ट्रेलरवरुन सेन्सॉर बोर्डाला नोटीस धाडली आहे.