Fact Check: अरुण गोविल यांनी दलित घरात जेवायला नकार दिल्याचा दावा खोटा, व्हिडीओ बनावट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:59 PM2024-04-16T18:59:19+5:302024-04-16T19:01:23+5:30

Arun Govil Viral Video Fact Check: मेरठ मतदारसंघातून भाजपाकडून तिकीट मिळालेले अरूण गोविल यांच्या व्हिडीओमागचे नेमके सत्य काय, जाणून घ्या

fact check bjp candidate arun govil from meerut viral video on social media refusing food at dalit is fake | Fact Check: अरुण गोविल यांनी दलित घरात जेवायला नकार दिल्याचा दावा खोटा, व्हिडीओ बनावट!

Fact Check: अरुण गोविल यांनी दलित घरात जेवायला नकार दिल्याचा दावा खोटा, व्हिडीओ बनावट!

Created By: आजतक फॅक्ट चेक
Translated By : ऑनलाइन लोकमत

Fact Check, Arun Govil Viral Video: 'रामायण'मध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी काही काळापूर्वी भाजपात प्रवेश केला. ते लोकसभेसाठी मेरठमधून भाजपचे उमेदवार आहेत. ते सध्या विविध विभागात प्रचारसभा आणि लोकांना भेटण्यासाठी जात आहेत. पण याच दरम्यान, त्यांच्यावर जातीयवादी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. ते वाल्मिकी समाजातील भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेले होते. या संदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. आज तक फॅक्ट चेक च्या टीमने त्या दाव्यांची सत्य पडताळणी केली.

सोशल मीडियावर 'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारणारे आणि मेरठमधूनभाजपाचे उमेदवार अरुण गोविल यांच्यावर जातीवादी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला जात असून प्रचारादरम्यान ते वाल्मिकी समाजातील भाजपा कार्यकर्त्याच्या घरी गेले, मात्र तेथे वाढलेले जेवण त्यांनी खाल्लं नसून जेवणाला दुरूनच नमस्कार केल्याचा दावा केला जात आहे.

५४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अरुण गोविल काही लोकांसोबत जमिनीवर बसलेले दिसत आहे. त्यांच्यासमोर जेवणाचे ताट ठेवले आहे, ज्यासमोर ते हात जोडताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओ शेअर करताना एका फेसबुक युजरने लिहिले की, मेरठमधील भाजपचे उमेदवार अरुण गोविल, वाल्मिकी समाजातील भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवण घेण्यासाठी गेले, पण त्यांनी जेवणाला दुरूनच नमस्कार केला आणि हातही लावला नाही. प्रभू रामाची भूमिका करूनही या माणसातून जातीवाद दूर झालेला नाही, ही व्यक्ती नेता बनण्याच्या लायकीची नाही. संपूर्ण भाजप जातिवादी आहे. या पोस्टची अर्काइव्ह लिंक येथे पाहता येईल.

या व्हिडिओच्या माध्यमातून लोक भाजपवर जातीवादी असल्याचा आरोपही करत आहेत. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.

यूपी काँग्रेसने लिहिले आहे की, प्रभु श्री राम यांनी त्रेतायुगात शबरीची उष्टी बोरं खाल्ली आणि २०२४ मध्ये ते दलितांच्या घरचे अन्न खात नाहीत. ही पोस्ट २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.

'आज तक फॅक्ट चेक'मध्ये असे आढळून आले की, व्हायरल व्हिडिओ हा एडिटेड म्हणजे बनावट आहे. हा व्हिडिओ मेरठमधील दलित समाजातील भाजप कार्यकर्ता नीतू जाटव यांच्या घरातील आहे, जिथे अरुण गोविल यांनी जेवण केले होते.

सत्य पडताळणी

व्हायरल दाव्याशी संबंधित कीवर्ड शोधताना, आम्हाला 13 एप्रिल 2024 रोजी प्रकाशित झालेला “अमर उजाला” चा अहवाल सापडला. या वृत्तानुसार, अरुण गोविल १३ एप्रिल रोजी निवडणूक प्रचारासाठी मेरठच्या भागवतपुरा भागात गेले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या दलित कार्यकर्त्या नीतू जाटव यांच्या घरी जेवण केले. त्यांच्यासोबत भाजपाचे काही लोकही उपस्थित होते.

अरुण गोविल हे दलित कुटुंबात जेवले आहेत याबद्दल अनेक मीडिया रिपोर्ट्स आम्हाला आढळले.

या माहितीच्या आधारे ‘आज तक’चे मेरठ प्रतिनिधी उस्मान चौधरी यांच्याशी संपर्क साधला. उस्मान यांनी सांगितले की 13 एप्रिल रोजी अरुण गोविल यांनी बूथ अध्यक्ष नीतू जाटव यांच्या घरी जेवण केले आणि नगरसेवक अरुण मचल वाल्मिकी यांच्या ठिकाणी चहा घेतला. उस्मानने त्यादिवशीचा एक व्हिडिओही पाठवला, ज्यामध्ये गोविल जेवताना दिसत आहेत. उस्मान यांनी आणखी व्हिडिओ देखील पाठवले, ज्यात अरुण गोविल अन्न खाताना आणि अन्न खाल्ल्यानंतर प्लेटला नमस्कार करताना दिसत आहेत. या आधारावर, असे म्हणता येईल की, ५४ सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमधील खाण्याचा भाग एडिट करून काढून टाकण्यात आला आहे.

अरुण गोविल यांनीही 13 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या अधिकृत X खात्यावर या दिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते अन्न खातानाही दिसत आहेत.

प्रभाग क्रमांक 3 - भागवतपुरा, मेरठ येथील भाजप नगरसेवक अरुण मचल वाल्मिकी यांच्याशीही संपर्क केला. ज्यांच्या घरी अरुण गोविल यांनी चहा घेतला. नीतू जाटव यांच्या घरीही अरुण मचल उपस्थित होते. 'आज तक'शी बोलताना अरुण यांनी सांगितले की, गोविल यांनी नीतू यांच्या घरी जेवण केले आणि आमच्या घरी चहा घेतला.

यानंतर नीतू जाटव यांच्याशीही बोललो. ‘आज तक’शी बोलताना नीतू म्हणाल्या की,  मी स्वतः अरुण गोविल यांना आमंत्रित केले होते आणि ते माझ्या घरी आले. मी माझ्या हाताने जेवण बनवले होते, जे त्यांनी आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी खाल्ले. मी दलित समाजातील आहे. त्यांनी पुष्टी केली की व्हायरल दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

निष्कर्ष- व्हायरल होणारा व्हिडीओ एडिट केलेला म्हणजेच बनावट आहे. त्यामुळे अरूण गोविल यांनी दलित कार्यकर्त्याच्या घरी जेवण्यास नकार दिल्याचा दावा खोटा आहे.

(सदर फॅक्ट चेक 'आजतक' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

Web Title: fact check bjp candidate arun govil from meerut viral video on social media refusing food at dalit is fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.