अरविंद स्वामींनी केली अभिनयाची प्रशंसा

By Admin | Published: June 3, 2016 01:41 AM2016-06-03T01:41:19+5:302016-06-03T01:41:19+5:30

‘काकस्पर्श’, ‘टाइमपास २’, ‘फुंतरू’ यासारख्या चित्रपटांमधून आज महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने तिची छाप प्रेक्षकांवर पाडलीच आहे.

Praise Arvind Swamy's performance | अरविंद स्वामींनी केली अभिनयाची प्रशंसा

अरविंद स्वामींनी केली अभिनयाची प्रशंसा

googlenewsNext

‘शाळा’, ‘टाइमपास’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास २’, ‘फुंतरू’ यासारख्या चित्रपटांमधून आज महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने तिची छाप प्रेक्षकांवर पाडलीच आहे. प्रत्येक चित्रपटातून वेगळ्या लकबीचा अभिनय करणारी केतकी आज तमीळ अन् हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. ‘काकस्पर्श’ हा सिनेमा महेश मांजरेकर तमीळमध्ये लवकरच प्रदर्शित करणार असून या चित्रपटात केतकीसोबत अरविंद स्वामी, टिस्का चोप्रा, मिलिंद सोमण यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज आहे. एवढेच नाही, तर तिने इलाई राजा यांच्यासाठी चार गाणीदेखील गायली आहेत. तिचा या चित्रपटाविषयीचा एकंदरीतच अनुभव तिने सीएनएक्ससोबत अगदी मनमोकळ्या अंदाजात शेअर केला आहे.
’काकस्पर्श चित्रपटाविषयी काय सांगशील?
- ‘शाळा’नंतर मला ‘काकस्पर्श’साठी महेश मांजरेकरसरांनी विचारले. मला चित्रपटाचा विषय आवडल्याने मी तो सिनेमा करण्याचे ठरविले, परंतु त्यामध्ये माझे केस नसणारेत, मला टक्कल असलेले दाखविण्यात येणार होते हे जेव्हा समजले, तेव्हा मी म्हणाले, ‘मला नाही करायचा हा सिनेमा.’ मग मी महेशसरांना फोन करून याबद्दल सांगितले. त्यांनी माझी समजूत काढली. ते आईसोबत बोलले, पण मी काही केल्या केस काढलेल्या रूपात समोर यायला तयार नव्हते. मग महेशसर मला म्हणाले की, अमिताभ बच्चन यांनी सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. रोमँटिक अन् अँग्री यंग मॅनच्या भूमिकांत प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारलेच, परंतु ‘पा’सारख्या चित्रपटातील त्यांची भूमिका अजरामर झाली. मग तुला कशा प्रकारचे रोल करायचे आहेत तूच ठरव. मला त्यांची ही गोष्ट पटली अन् मी लगेच सिनेमासाठी होकार कळवला.
’‘काकस्पर्श’ आता तमीळ अन् हिंदीमध्ये येत आहे, त्याबद्दल काय सांगशील?
- जेव्हा हिंदी अन् तमीळ काकस्पर्श करण्याचे ठरले, तेव्हा महेशसरांनी मला फोन केला अन् विचारले की, जेव्हा तू काकस्पर्श केलास, त्या वयाची एखादी मुलगी सांग ना हिंदीसाठी. मग मी त्यांना एक-दोन मुलींची नावे सांगितली, पण नंतर त्यांचा फोन आला अन् ते म्हणाले की, यामध्ये तुलाच काम करायचे आहे. अशा प्रकारे मला हा सिनेमा मिळाला.
’अरविंद स्वामी यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत काम करायचा तुझा अनुभव कसा होता?
- मला जेव्हा समजले की, यामध्ये अरविंद स्वामी काम करणार आहेत, तेव्हा खरेच खूप आनंद झाला. त्यांच्या लूक टेस्टच्या वेळी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. त्यांनी मराठी ‘काकस्पर्श’ पाहिला होता. मी सेटवर बसले होते, तेव्हा आल्या-आल्या त्यांनी मला ‘तू खूप छान काम केले आहेस,’ अशी कॉम्लिमेंट दिली. मला खरंच खूप छान वाटलं. तो माणूस खूप हम्बल आहे. एवढे मोठे अ‍ॅक्टर असूनदेखील सगळ्यांशीच सेटवर ते आपुलकीने वागत. त्यांच्यासोबत काम करताना दडपण यायचे, परंतु सीन होऊन जायचे. आम्ही टेकच्या आधी खूपच टेन्शन घेतो, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर अजिबातच टेन्शन दिसायचे नाही. अगदी सहजतेने ते शॉट द्यायचे. टेन्शन घ्यायचे नाही, हे मी त्यांच्याकडून शिकले. यामध्ये टिस्का चोप्रा, मिलिंद सोमण यांच्यादेखील भूमिका आहेत.
’मराठी काकस्पर्श अन् आता तमीळ, तर दोन्हींमध्ये काम करताना काय वेगळेपण जाणवले तुला?
- मी जेव्हा मराठी ‘काकस्पर्श’ केला, तेव्हा १६ वर्षांची होते अन् १४ वर्षांच्या मुलीची भूमिका करायची होती, परंतु आता तमीळमध्ये काम करताना मी १९ वर्षांची होते आणि मला १४ वर्षांच्या मुलीची भूमिका साकारायची होती, हे खरंच अवघड होतं. मला वाटले की, थोडा मेकअप करून ते तसे कॅरेक्टर दाखवतील, परंतु महेशसरांनी स्पष्ट सांगितले होते की, मी तुला मेकअप देणार नाही. एवढेच काय, तर पावडरदेखील लावायची नाही. तुला जे काही करायचेय ते तुझ्या अभिनयातून दाखव. हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते, परंतु मी हे आव्हान स्वीकारले. मी तमीळ फिल्म पाहिल्या. त्या मुलींची बॉडी लँग्वेज शिकली अन् ती गोष्ट वर्क झाली.
’तमीळमध्ये चित्रपट करीत असताना तुला भाषेसंदर्भात काही अडचणी आल्या का?
- तमिळ भाषा एवढी फास्ट आहे की, लोक काय बोलतात, हेच मला समजायचे नाही, परंतु आम्ही हिंदी अन् तमीळ ‘काकस्पर्श’ एकाच वेळी शूट करीत होतो. हिंदी सीन झाला की, लगेच तमीळ सीन शूट व्हायचा, त्यामुळे मला लिंक लागायची की, नक्की आपण काय डायलॉग्ज बोलत आहोत. त्यामुळे तमीळ शिकले जरी नसले, तरी काम करताना मला कोणत्याच प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत.
’या चित्रपटासाठी तू संगीतकार इलाई राजा यांच्यासोबत काम केले आहेस, तोे अनुभव कसा होता?
- इलाई राजा यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच आहे. मला महेशसरांनी एकदम सहज सांगितले की, या चित्रपटाला इलाई राजा संगीत देणार आहेत, तेव्हा माझी ‘ओके’ अशी रिअ‍ॅक्शन होती. त्यानंतर ते म्हणाले की, ‘तुला यात गाणी गायची आहेत.’ मला आनंद झाला, पण वाटले की, अरे त्यांनाही माझा आवाज आवडला पाहिजे, परंतु महेशसरांनी माझी गाणी त्यांना आधीच ऐकवली होती अन् त्यांना ती आवडली. मी दोन हिंदी गाणी गायल्यानंतर मला महेशसर म्हणाले, ‘आता तमीळ गाणी ते दुसऱ्या सिंगरकडून गाऊन घेतील.’ परंतु एके दिवशी मला महेशसरांचा फोन आला अन् ते म्हणाले की, ‘तुला चेन्नईला जावे लागेल. इलाई राजा यांनी तमीळ गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी तुला बोलावले आहे.’ अशा प्रकारे मी त्यांच्यासोबत चार गाणी गायली आहेत.

Web Title: Praise Arvind Swamy's performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.