निखिलेश चित्रे

मध्यमवर्गीय पात्रानं उच्चवर्गापर्यंत केलेला प्रवास हा मध्यमवर्गीय प्रेक्षकाच्या जिव्हाळ्याचा विषय. या प्रवासात जर त्या पात्रानं व्यवस्थेला वेठीला धरलं असेल, चकवलं असेल तर मध्यवर्गीय प्रेक्षकाला विशेष आनंद होतो, कारण त्याच्या व्यवस्थेवर असलेल्या रागाचं सुप्त विरेचन होतं. या पात्राचा उत्तरार्धातला शोकांत प्रेक्षकासाठी फारसा महत्वाचा नसतो, तर पूर्वार्धातला उत्कर्ष त्याला जास्त जवळचा वाटतो. सत्तर आणि ऐशीच्या दशकातला अमिताभ बच्चनचा उदय आणि लोकप्रियता यांची मुळं मध्यमवर्गाच्या व्यवस्थेवरच्या रागामध्ये आहेत, हे सर्वज्ञात आहे. स्कॅम -1992 या मालिकेत हे नेमकं हेरुन त्याचा कुशल वापर केलेला दिसतो.

पटकथेची रचना अतिशय खुबीने करण्यात आली आहे. त्यात मेहताची विरुद्ध बाजू मांडणारे प्रसंग आहेत. पण त्यांची मांडणी अशी आहे, की मेहताची बाजू घेणाऱ्या प्रसंगांचाच परिणाम प्रेक्षकावर जास्त व्हावा. सुचेता दलाल हे पात्र मेहताचा घोटाळा उघड करतं. मेहताला अटक होते. त्यानंतर एका प्रसंगात सुचेता दलाल मेहताच्या घरी गेल्यावर मेहताची बायको एवढे लोक गैरकारभार करतायत, पण तुम्हाला हर्षद मेहताच कसा गुन्हेगार दिसतो, असा सवाल करते. त्यावर दलाल निरुत्तर होते. सुरुवातीपासूनच मेहताचे शत्रू आणि  त्यांनी मेहताला संपवण्यासाठी केलेली विविध कारस्थानं दाखवणाऱ्या प्रसंगांचं लेखन मेहताचं बिच्चारेपण ठसवण्यासाठीच केलेलं आहे. 

उत्तरार्धात, मेहताचा मित्र कर्जबाजारी झाल्यानंतर आत्महत्या करतो. त्याच्या अंत्यदर्शनाला गेलेल्या मेहताला मित्राची बायको खडे बोल सुनावते. तो मान खाली घालून ऐकून घेतो. त्यानंतर येणाऱ्या घटनाक्रमात मेहताच्या भागीदाराने केलेली त्याची फसवणूक, मेहताला झालेली अटक आणि त्याचा मृत्यू या घटना सलग येतात. त्यात मेहताच्या मित्राची आत्महत्या आणि त्याच्या बायकोने मेहताला विचारलेला जाब याचा परिणाम पूर्ण पुसून जातो आणि शेवटी सर्व सहानुभूती मेहताच्या पात्राला मिळते. 

मेहताच्या व्यक्तिमत्वाचं असामान्यत्व ठसवण्यासाठी त्याच्या अवतीभवती असणारी पात्र नेहमी त्याच्या धडाडी, आत्मविश्वास, बुद्धीमत्ता या गुणांनी थक्क होताना दाखवलेली आहेत. कारण प्रेक्षकानेही तशीच प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे. करण व्यास यांचे संवाद मेहताच्या उदात्तीकरणात मोठा हातभार लावतात. त्याची देशभक्ती, प्रामाणिकपणा, कुटंबवत्सलता हे सगळं संवादांमधून ठळक केलं जातं. इतर पात्रं वारंवार मेहताची अमिताभ बच्चनशी तुलना करत राहतात. मेहताचं बच्चनत्व सिद्ध करण्यासाठी त्याच्या तोंडी ‘रिस्क नही तो इस्क नही’ असे फिल्मी संवाद ध्रुवपदासारखे येतात. मेहता हा एका विराट घोटाळ्यातले केवळ एक छोटा घटक आहे, हे अनेक पात्रांच्या तोंडून वदवलं जातं.

पटकथेत मेहताच्या उदात्तीकरणासाठी वापरलेले हे घटक पटकथेच्या प्रत्यक्षीकरणातही तेवढेच परिणामकारक झालेले आहेत. पूर्वार्धात मेहताचं मोठं होत जाणं ठसवण्यासाठी वापरलेले वाइड लो अँगल शॉटस्, उत्तरार्धात तो गर्दीमधून स्लो मोशनमध्ये चालत जाताना कॅमेरा पाठीमागून मिडक्लोज शॉटच्या फ्रेममधून त्याच्या मागे जाणं, विविध प्रसंगांमध्ये गर्दीकडे पाहून उंचावून हलवलेला हात (तोही स्लो मोशनमध्ये हलवल्यामुळे अधोरेखित होणारं मोठेपण) – हे पाहताना ‘कॅमेरा अँगल ही तांत्रिक नव्हे तर नैतिक निवड असते’ या गोदारच्या सुप्रसिद्ध विधानाची आठवण होते. 

मालिकेच्या थीम संगीतातली गिटारची चैतन्यमय रांगडी धून आणि गुजराती लोकसंगीताची आठवण करुन देणारा हेलकारा मेहताचं ‘हिरो’ असणं अधोरेखित करतात. त्याने केलेल्या घोटाळ्याचे गंभीर परिणाम ठसवण्याचा कोणताही प्रयत्न मुद्दामच केलेला नाही. ते ‘सांगण्याचं’ काम केवळ काही संवादांमधून उरकतं.  उलट  घोटाळ्याची जबाबादारी अनेकांची कशी आहे हे दाखवण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याचं दिसतं. मालिका संपते तेव्हा हर्षद मेहता हा व्यवस्थेचा शिकार झालेला एक जीनियस, चतुर, प्रेमळ असा असामान्य माणूस होता ही भावना प्रेक्षकाच्या मनात निर्माण करण्यात निर्मात्यांना यश आलेलं असतं.
 

Web Title: Harshad Mehta Scam 1992 Review: Interesting journey of Harshad Mehta, but there is something to think about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.