सीएच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलणार; १९ मार्चला सुधारित वेळापत्रक
By रेश्मा शिवडेकर | Updated: March 17, 2024 16:25 IST2024-03-17T16:25:05+5:302024-03-17T16:25:14+5:30
जूनची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. तपशीलवार सुधारित वेळापत्रक १९ मार्चला संध्याकाळी www.icai.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

सीएच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलणार; १९ मार्चला सुधारित वेळापत्रक
मुंबई - सीए फाऊंडेशन आणि इंटरमिजिएटच्या मे-जून महिन्यांत होणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांकरिता सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडिया’ने आयसीएआय) जाहीर केले आहे.
परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, याची कल्पना संस्थेने आधीच दिली होती. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक १९ मार्चला जाहीर करण्यात येईल. सीए इंटरमिजिएट गट १ ची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी होणार होती. तर गट २ परीक्षा ९, ११ आणि १३ मे रोजी होणार होती.सीए गट १ ची परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी तर गट २ ची परीक्षा ८, १० आणि १२ मे रोजी होणार होती. सीए फाऊंडेशन कोर्सची परीक्षा २०, २२, २४, २६ जूनला होणार होती.
मे महिन्यात देशभरात अनेक ठिकाणी मतदान होणार असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे आयसीएआयच्या परीक्षा विभागाचे संचालक एस. के. गर्ग यांनी कळविले आहे. जूनची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. तपशीलवार सुधारित वेळापत्रक १९ मार्चला संध्याकाळी www.icai.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.