विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार

By यदू जोशी | Published: April 3, 2024 12:09 PM2024-04-03T12:09:39+5:302024-04-03T12:12:31+5:30

Eknath Shinde: ठाकरेंची सद्दी संपविण्याचा तर्क देऊन मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या शिंदेंसमोर आता लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. शिंदेंकडे पक्ष गेला, धनुष्यबाण हे चिन्हही गेले पण शिवसेना खरेच गेली का याचा फैसला होण्याची घडी आता समीप येऊन ठेपली आहे.

Special Article: What will happen to Eknath Shinde? | विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार

विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार

- यदु जोशी
मला उपमुख्यमंत्री केले तर मी उद्धव ठाकरेंची सद्दी संपवू शकणार नाही, दुसरे म्हणजे मी उपमुख्यमंत्री झालो तर राज्यभरातील शिवसैनिक म्हणतील, तुम्ही काय हशील केले? आपले (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री होते, त्यांना हटवून तुम्ही उपमुख्यमंत्री झालात मग तुम्ही मिळवले काय...? शिवसैनिकांच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसेल. म्हणूनच मला मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे असे दोन तर्क एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाताना दिल्लीतील भाजपच्या श्रेष्ठींना दिले होते म्हणतात आणि ते मान्य करण्यात आले. शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. 

ठाकरेंची सद्दी संपविण्याचा तर्क देऊन मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या शिंदेंसमोर आता लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. शिंदेंकडे पक्ष गेला, धनुष्यबाण हे चिन्हही गेले पण शिवसेना खरेच गेली का याचा फैसला होण्याची घडी आता समीप येऊन ठेपली आहे. महायुतीत आलेला तिसरा पक्ष म्हणजे अजित पवारांचा गट. शिंदेंच्या पक्षापेक्षा अजितदादांना निम्म्याही लोकसभा जागा लढायला मिळणार नाहीत हे खरे असले तरी भाजपला मित्रपक्ष म्हणून आमचा गट अजित पवारांपेक्षा कसा आणि किती उपयुक्त आहे हे शिंदेंना सिद्ध करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जागा निवडून आणाव्या लागतील. तसेच भाजपच्या जागा निवडून येण्यासाठी अजित पवारांपेक्षा मी कसा उपयुक्त ठरलो हेही सिद्ध करावे लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर जागावाटपाची चर्चा करताना शिंदेंचा खूप कस लागतो आहे. कारणही तसेच आहे. तत्कालीन शिवसेनेचे १८ पैकी १३ खासदार शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे सिटिंग-गेटिंग फॉर्म्युल्यानुसार या १३ जागा तर आपल्याला मिळायलाच हव्यात, आणखी दोन जागा द्या म्हणून शिंदेंचा आग्रह आहे. भाजप ते मान्य करायला तयार नाही. शिंदेंच्या पारड्यात जास्त जागा टाकल्या की अजित पवारांचा गट मागे लागतो अशी भाजपची अवस्था आहे. शिंदे दिसतात साधे पण मनाचे करवून घेतात, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतरांनाही हा अनुभव वेळोवेळी येतच असेल. यावेळी मनासारख्या जागा पदरात पाडून घेण्यात शिंदेंना कितपत यश येते ते आज, उद्या कळेलच. 

ही लोकसभा निवडणूक शिंदेंसाठी आणखी काही कारणांनीही महत्त्वाची आहे. २०२२ मध्ये ते भाजपच्या साथीने मुख्यमंत्री झाले, ती त्यावेळची भाजपचीही मजबुरी होती. अशी मजबुरी दरवेळी राहीलच असे नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीला दमदार यश मिळवून देणे आणि हे यश आपल्यामुळे कसे मिळाले याची मुद्देसूद मांडणी दिल्लीश्वरांकडे करणे हे शिंदेंच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असेल. उद्धव ठाकरे गटापेक्षा अधिक जागा किंवा त्यांच्यापेक्षा अधिकच्या सरासरीने जागा शिंदे यांना जिंकाव्या लागतील. तसे झाले तरच खरी शिवसेना माझीच या आपल्या दाव्यावर सर्वसामान्य मतदारांनीही मोहोर उमटविल्याचे शिंदे छातीठोकपणे सांगू शकतील. लोकसभा निवडणुकीतील त्यांची कामगिरी ही विधानसभेच्या यशाचे दार उघडणार की बंद होणार याचा फैसला करणारी असेल. लोकसभाच नव्हे तर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळीही शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे फडणवीस, बावनकुळे नेहमीच सांगतात. मात्र, विधानसभेनंतर काय होईल, शिंदेच मुख्यमंत्री राहतील की आणखी कोणी या प्रश्नाचे उत्तर लोकसभेच्या निकालात दडलेले असेल.

Web Title: Special Article: What will happen to Eknath Shinde?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.