मुहूर्त पाहून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी एवढा विचार करावा, की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 08:00 IST2024-04-08T07:59:41+5:302024-04-08T08:00:11+5:30
मुहूर्त पाहून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे नेते ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हे संवैधानिक मूल्य पायदळी तुडवत आहेत, तसेच संतांचाही अपमान करीत आहेत!

मुहूर्त पाहून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी एवढा विचार करावा, की...
कृष्णा चांदगुडे
भारत हा अनेक दृष्टीने विसंगतींचा देश समजला जातो. त्यातील एक विसंगती म्हणजे टोकाचा वैज्ञानिक दृष्टिकोन व टोकाच्या अंधश्रद्धा अशा दोन्हींचे अस्तित्व! पं. जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळणार होते, तशी तारीख पक्की झाली होती, पण काही ज्योतिषांनी हा दिवस अशुभ असल्याचा व त्यामुळे देशाचे भविष्य चांगले होणार नसल्याचा शोध लावला. काहींनी स्वातंत्र्यासाठी एक दिवस उशिराचा मुहूर्त धरण्याचा आग्रह नेहरूंकडे धरला; परंतु नेहरूंनी ही मागणी फेटाळून लावली. तसे केले तर तो शहिदांचा अपमान होईल, असे नेहरूंनी म्हटले होते. पं. नेहरू यांच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सध्या राजकारण्यांना विसर पडला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांनी मुहूर्त पाहून आपले उमेदवारी अर्ज भरून ते दाखल करण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ते फलज्योतिषांचे उंबरठे झिजवत आहेत. यामुळे फलज्योतिषासारख्या थोतांड विषयाला मोठी प्रसिद्धी आणि फलज्योतिषांच्या धंद्यात बरकत होण्याचा मार्ग प्रशस्त होऊन धंद्याला सुगीचे दिवस येणार आहेत. जे उमेदवार मुहूर्त पाहून आपला उमेदवारी अर्ज भरतात, त्यांची कीव करावी, अशी परिस्थिती आहे. त्यांचा स्वतःच्या स्वकर्तृत्वावर अजिबात विश्वास नाही, हे त्यांच्या मुहूर्त पाहण्याच्या कृतीवरून सिद्ध होते.
जर त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे आणि नैतिकपणे लोक समस्या सोडविण्याचा वेळच्यावेळी आटोकाट प्रयत्न केला असता तर लोकांनीच त्यांना उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असता. मग त्यांना अर्ज भरण्यासाठी फलज्योतिषाकडे जाऊन त्याचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन मुहूर्त पाहण्याची गरज उरली नसती. एकाच मतदारसंघातील अनेक उमेदवार मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज भरतात. मात्र, त्यापैकी एकच उमेदवार निवडून येतो. मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज भरलेले आणि तरीही पराभूत झालेले उमेदवार या विसंगतीचा विचार मतदारांनीच करायला हवा.
दुसऱ्या बाजूला हे लोकप्रतिनिधी निवडून जाऊन भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहेत, असे मानले तर मुहूर्त पाहून अर्ज भरण्याची त्यांची ही दैववादी कृती राज्यघटनेतील प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णपणे विसंगत आहे. नशीब, प्राक्तन, मुहूर्त, शुभ-अशुभ वेळ, शकुन-अपशकुन अशा अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धायुक्त संकल्पनांबाबत महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्या त्या काळात समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांनी तर अशुभ समजल्या जाणाऱ्या अमावास्येच्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेक लढाया लढल्या व जिंकल्याही! त्यांचाही आदर्श राजकारणी विसरत आहेत.
जे उमेदवार मुहूर्त पाहून आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत, ते संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन या मौलिक मूल्याला पायदळी तुडवत आहेत तसेच संतांचाही अपमान करीत आहेत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत. कर्नाटकातील विवेकवादी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश झारकीहोळी हे कोणताही मुहूर्त न पाहता मुद्दाम अमावास्येच्या दिवशी अथवा अशुभ मानल्या जाणाऱ्या वेळेत आपला उमेदवारी अर्ज भरतात. स्मशानभूमीतून प्रचार यात्रा सुरू करतात. असे करून ते चार वेळा विधानसभेवर निवडून आलेले असून त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांबद्दल सारासार विवेक वापरून आणि कोणत्याही प्रलोभनाला व दबावाला बळी न पडता, प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राज्य कार्यवाह आहेत)
krishnachandgude@gmail.com