BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:38 IST2025-12-17T11:35:14+5:302025-12-17T11:38:49+5:30
Tuljapur Political Clash News: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये राजकीय वैमनस्यातून दोन गटात मोठा राडा झाला.

BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये राजकीय वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. गोलाई चौक परिसरात रस्ते कामाच्या वादातून भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यात तलवार, चाकू आणि कोयत्याचा उघडपणे वापर करण्यात आला असून, हवेत गोळीबार झाल्याचेही सांगण्यात आले. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील गोलाई चौकातील पंचायत समिती जवळील रस्त्याच्या कामावरून वादाची ठिणगी पडली. भाजपचे उमेदवार पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीचे ऋषी मगर यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले आणि त्यांनी एकमेकांवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला.
काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
या हाणामारीत काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कुलदीप मगर यांच्या मानेवर गंभीर जखम झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आचारसंहितेचा फज्जा, शहरात दहशतीचे वातावरण
निवडणूक जाहीर झाल्यामुळे शहरात आचारसंहिता लागू आहे, तरीही अशा प्रकारे शस्त्रांचा वापर आणि गोळीबार झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन जमावाला पांगवले. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून गोलाई चौक आणि संवेदनशील भागात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संशयितांची धरपकड सुरू
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांची धरपकड सुरू केली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोळीबार नेमका कोणी केला आणि शस्त्रे कोठून आली? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे तुळजापुरातील राजकीय वातावरण तापले असून मतदारांमध्ये दहशत पसरली आहे.