केशोरी तलावाच्या काठावर आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 19:39 IST2022-08-28T19:37:52+5:302022-08-28T19:39:16+5:30
देवरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाची ओळख पटली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते

केशोरी तलावाच्या काठावर आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह
गोंदिया : देवरी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील तलावाच्या काठावर आढळला. ही घटना रविवारी (दि.२८) दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अयान असलम बेग उर्फ अय्यु (१८) रा. प्रभाग क्रमांक १४ देवरी असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे.
देवरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाची ओळख पटली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. अयान बेग हा आपल्या परिवारासोबत राहत होता. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजतापासून अयान बेपत्ता झाला होता. घरातील सदस्य, नातेवाई व मित्रांकडून शोधाशोध केली पण त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी देवरी पोलीस ठाण्यात अयान बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास केशोरी तलावात अयानचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह बेपत्ता असलेला अयानचाच असल्याची ओळख नातेवाईक व घरच्या सदस्यांकडून पटली. याप्रकरणी देवरी पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे.