तीन मुलींनंतर मुलगा झाला अन् वडिलांनी उचललं धक्कादायक पाऊल; ऐकून सर्वांचाच थरकाप, संपूर्ण गाव सुन्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:27 IST2022-07-14T16:26:14+5:302022-07-14T16:27:18+5:30
रिवा जिल्ह्यात अंधश्रद्धेतून घडलेल्या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी एका युवकाचा बळी दिला गेल्याचा प्रकार उघडीकस आला आहे.

तीन मुलींनंतर मुलगा झाला अन् वडिलांनी उचललं धक्कादायक पाऊल; ऐकून सर्वांचाच थरकाप, संपूर्ण गाव सुन्न!
रिवा-
रिवा जिल्ह्यात अंधश्रद्धेतून घडलेल्या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी एका युवकाचा बळी दिला गेल्याचा प्रकार उघडीकस आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेनं सर्वच सुन्न झाले आहेत. नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार रिवा जिल्ह्यातील वैकुंठपूर ठाणे हद्दीतील आहे.
गेल्या आठवड्यात एका तरुणाचा मृतदेह गावातील देवीच्या मंदिराच्या आवारात आढळून आला. मृतदेहाशेजारी रक्तानं माखलेली कुऱ्हाड देखील आढळून आली होती. त्यामुळे प्रथमदर्शनी हा प्रकार नरबळी असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानुसार चौकशीला सुरुवात केली.
वैकुंठपूर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपी रामलाल प्रजापती याला अटक केली आहे. त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं जी कहाणी सांगितली ती मन हेलावणारी होती. आरोपी सध्या तुरुंगात आहे. सलग तीन मुली झाल्यामुळे नाखुश असलेल्या रामलाल यानं पुत्र प्राप्तीसाठी देवीकडे मन्नत मागितली होती. जर मुलगा झाला तर नरबळी तुला चढवेन अशी मन्नत रामलाल यानं केली होती. इच्छा पूर्ण झाल्यानंतर रामलाल यानं गावातील एका तरुणाची कुऱ्हाडीनं हत्या करुन त्याचा मृतदेह मंदिरात आणून ठेवला आणि तिथून तो फरार झाला.
मंदिराजवळ सापडला मृतदेह
वैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या बेधुआ गावात असलेल्या देवीच्या मंदिरात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी खळबळजनक खुलासा झाला आहे. बेधुआ गावात एका चबुतऱ्यावर देवीची मूर्ती बसवण्यात आली आहे. 6 जुलै रोजी मंदिराजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची ओळख पटली आणि त्याचं नाव दिव्यांश कौल असल्याचं समोर आलं. चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की, गावातील रामलाल प्रजापती हे दिव्यांशसोबत शेवटचे दिसले होते. संशयाच्या आधारे रामलालला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, या घटनेतील भयानक सत्य समोर आले.