खर्रा न देण्यावरुन वाद, युवकाच्या गळ्यावर चाकूने वार केले; आरोपील अटक
By चैतन्य जोशी | Updated: March 4, 2023 13:07 IST2023-03-04T12:56:43+5:302023-03-04T13:07:04+5:30
आरोपीस केली अटक : वायफड येथील घटनेने खळबळ

खर्रा न देण्यावरुन वाद, युवकाच्या गळ्यावर चाकूने वार केले; आरोपील अटक
वर्धा : खर्रा मागण्याच्या कारणातून झालेल्या वाद चांगलाच विकोपाला गेला अन् संतापलेल्याने युवकाच्या गळ्यावर तसेच कंबरेखाली चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वायफड येथील बाजारचौकात घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी ३ रोजी आरोपीला अटक केली. प्रकाश लक्ष्मण शेंदरे (३२) रा. वायफड असे अटक आरोपीचे नाव आहे. तर पंकज बाबाराव शिंगपुरे असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज शिंगपुरे हा खर्रा घेत असताना तेथे आरोपी प्रकाश शेंदरे आला दोघांत खर्रा मागण्याच्या कारणातून शाब्दीक वाद झाला. दरम्यान संतापलेल्या प्रकाशने रागाच्या भारात पंकजच्या गळ्यावर तसेच कंबरेखाली चाकूने सपासप वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी मध्यस्थी करुन वाद सोडवला आणि जखमी पंकजला थेट रुग्णालयात दाखल केले. पंकजच्या मृत्यूपूर्व बयाणावरुन पुलगाव पोलिसांनी आरोपी प्रकाशविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यास ३ रोजी अटक केल्याची माहिती दिली.